नंदुरबारमध्ये काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी 69 हजार मतांनी आघाडीवर !
जळगाव टुडे । नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी आघाडी घेतली आहे, तर भाजपच्या उमेदवार हिना गावित पिछाडीवर पडल्या आहेत. आतापर्यंतच्या मतमोजणीत काँग्रेसचे गोवाल पाडवी यांना 1 लाख 43 हजार 916 मते मिळाली आहेत आणि भाजपच्या हिना गावित यांना 74 हजार 702 मते मिळाली आहेत. (Loksabha Election Result)
काँग्रेसचे उमेदवार पाडवी यांनी सुमारे 69 हजार 214 मतांनी आघाडी घेतली आहे. मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या असलेल्या हिना गावित यांना भाजपने नंदुरबारमध्ये यंदा तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी दिली आहे. नंदुरबारच्या या जागेसाठी स्वतः मंत्री विजयकुमार गावित तसेच भाजपचे नेते संकटमोचक गिरीश महाजन यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ तसा पूर्वापार काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, गेल्या दोन पंचवार्षिकपासून त्याठिकाणी भाजपच्या हिना गावित विजयी झाल्या आहेत. यावेळी नंदुरबारमध्ये कोण बाजी मारते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.