जळगाव, रावेरची निवडणूक मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी सोपी नव्हतीच !
जळगाव टुडे । लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीतून जळगाव आणि रावेरच्या जागांवर महायुतीने निर्णायक आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे. स्मिता वाघ आणि रक्षा खडसे हे दोन्ही उमेदवार आता विजयाच्या उंबरठ्यावर देखील आहेत. दरम्यान, भाजप नेते गिरीश महाजन यांनी दोन्ही जागा प्रत्येकी पाच लाखांच्या मताधिक्याने विजयी होण्याचा दावा यापूर्वीच केलेला होता. प्रत्यक्षात दोन्ही उमेदवारांची अडीच लाखांचे मताधिक्य गाठतानाही मोठी दमछाक झाल्याचे दिसून आले आहे. त्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे. (Loksabha Election Result)
लोकसभेची निवडणूक घोषीत झाल्यानंतर जळगावसह रावेर तसेच धुळे, नंदुरबार मतदारसंघांसाठी उमेदवार देताना आपल्याला विचारणा होईल, अशी अपेक्षा भाजप नेते गिरीश महाजन बाळगून होते. प्रत्यक्षात केंद्रीय नेतृत्वाने महाजन यांच्यासारख्या स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेता वरूनच उमेदवारांची नावे निश्चित केली. त्यामुळे मंत्री महाजन हे सुरूवातीला नाराज देखील झाले होते. मात्र, पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून नंतर त्यांनी भाजपच्या तिकिटावर उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांसाठी जीवाचे रान केले होते. दरम्यानच्या काळात विशेषतः जळगाव व रावेरमधील दोन्ही उमेदवार प्रत्येकी सुमारे पाच लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील, असा दावा देखील मंत्री महाजन यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना वारंवार केला होता.
महायुतीचे तीन मंत्री जळगाव जिल्ह्यात असल्याने कदाचित मंत्री महाजन यांना यावेळी दोन्ही जागा मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा विश्वास होता. परंतु, गेल्या वेळी होती तशी मोदी लाट यावेळी नव्हती. तशात समोरून महाविकास आघाडीने जोरदार ताकद लावल्याने जळगाव व रावेरमध्ये मोठी चुरस निर्माण झाली. परिणामी, पाच लाखांच्या मताधिक्याचा जादुई आकडा गाठण्याचा दावा सोडून शेवटी शेवटी दोन्ही उमेदवारांना चांगल्या मतांनी निवडून आणण्यासाठी मंत्री महाजनांना मोठी तारेवरची कसरत करावी लागली.
सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले खासदार उन्मेश पाटील यांनी त्यावेळी सुमारे चार लाखांचे मताधिक्य घेतले होते. त्यातुलनेत यंदाच्या निवडणुकीत भाजपला विशेषतः जळगावमध्ये जवळपास निम्मेच मताधिक्य गाठता आले आहे. यावरून यंदाची लोकसभा निवडणूक भाजपसाठी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी अजिबात सोपी नव्हती, याचा अंदाज सर्व सामान्यांना येऊन गेला आहे.