शरद पवारांचा करिश्मा कायम….राष्ट्रवादीची 10 पैकी 07 जागांवर आघाडी !
जळगाव टुडे । पक्षात उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदा महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या वाट्यावर यंदा फक्त 10 जागा आल्या होत्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शरद पवारांचा करिश्मा कायम असल्याने त्यांच्या राष्ट्रवादीने 10 पैकी तब्बल 07 जागांवर आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे. तुलनेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आतापर्यंत फक्त एका जागेवरच आघाडी घेता आली आहे. (Loksabha Election Result)
शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या आघाडीवर असलेल्या उमेदवारांमध्ये सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, भास्कर भगरे, बजरंग सोनवणे, नीलेश लंके, बाळ्यामामा म्हात्रे, अमर काळे, धैर्यशिल मोहिते पाटील यांचा समावेश आहे. सर्व उमेदवारांनी मोठी आघाडी घेतल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार खूपच मागे पडले आहेत.
आतापर्यंत हाती आलेल्या मतमोजणीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीने राज्यात 26 जागांवर आघाडी घेतली आहे. पैकी शिवसेना ठाकरे गटाने 09, काँग्रेसने 10 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने 07 जागांवर आघाडी घेतली आहे. तुलनेत भाजप 13, शिवसेना शिंदे गट 07 आणि अजित पवार राष्ट्रवादी फक्त एका जागेवर पुढे असल्याचे दिसून आले आहे.