तर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत, भाजपचा सुफडा साफ झाला असता…!
जळगाव टुडे । लोकसभा निवडणुकीचे संभाव्य बलाबल स्पष्ट करणारी विविध एक्झिट पोल्सची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांना एखाद्या जागेच्या फरकाने निम्म्या-निम्म्या जागा मिळणार असल्याचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्या सध्या थोड्या निश्चिंत देखील दिसत आहेत. मात्र, भाजपासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. त्यांनी निवडणुकीच्या आधी केलेले फोडाफोडीचे प्रयत्न थोडे जरी कमी पडले असते तर महाराष्ट्रात यावेळी भाजपचा सुफडाच साफ झाला असता, असे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. (Loksabha Election Result)
सी-व्होटरने पोलमध्ये दिलेल्या आकडेवारीमध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 24 आणि महायुतीला 23 जागा मिळणार असल्याचे सांगितले आहे. पैकी महायुतीमधील भाजपला 17, शिवसेना शिंदे गटाला 06 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला फक्त 01 जागा मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गटाला 09, काँग्रेसला 08 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला एकूण 06 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला गेला आहे. सदरची आकडेवारी लक्षात लोकसभा निवडणुकीत मूळ शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या गटाला मतदारांनी फार मनावर घेतलेले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची, हे देखील स्पष्ट होणार आहे. मूळ (असली) पक्षातून बाहेर पडलेल्यांना कदाचित विधानसभा निवडणुकीच्या आधी घरवापसी करण्याचा विचार सुद्धा करावा लागणार आहे.
एकनाथ शिंदे आणिअजित पवार यांना फोडणे भाजपच्या पथ्यावर…
एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार वैयक्तिक भाजपला यावेळी महाराष्ट्रात जेमतेम 17 ते 18 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त झाला आहे. तर भाजपासोबतच्या शिवसेना शिंदे गट व अजित पवार गटाला मोजून सात जागा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. एकंदर आकडेवारी लक्षात घेता महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी फोडले नसते तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपची काही खैर नव्हती, हे देखील स्पष्ट होत आहे. कदाचित लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा महाराष्ट्रातील सुफडाच साफ झाला असता, असेही राजकीय विश्लेषकांनी म्हटले आहे.