बारामतीत एकदा नाही तर दोनदा वाजणार तुतारी ! सुप्रिया सुळेंच्या अडचणीत वाढ
निवडणूक आयोगाने आक्षेप फेटाळल्याने पेच
Jalgaon Today : राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामतीच्या लोकसभा (Loksabha Election) मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करून सुनेत्रा पवार यांनी आधीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चिंता वाढवली आहे. त्यात या मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवाराला तुतारीचे चिन्ह मिळाल्याने सुप्रिया सुळेंच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, निवडणूक आयोगानेही त्यांचा आक्षेप फेटाळून लावला आहे.
अजित पवार गटाने बंडाचे निशाण फडकावल्यानंतर शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला तुतारी वाजवणाऱ्या माणसाचे चिन्ह निवडणूक आयोगाने बहाल केले आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीसाठी राज्यात उमेदवारी करणाऱ्या सर्व उमेदवारांचेही तेच चिन्ह आता असणार आहे. अशा या परिस्थितीत बारामतीमध्ये अपक्ष उमेदवारी करणाऱ्या एका उमेदवाराला नेमके तुतारीचे चिन्ह मिळाले आहे. वास्तविक तुतारी आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हात मोठा फरक आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने देखील सुप्रिया सुळेंच्या वकिलाने नोंदविलेला आक्षेप सपशेल फेटाळला आहे. अर्थातच, फरक असला तरी समोरचे तुतारी हे चिन्ह पाहुनच अनेकांचा गोंधळ उडण्याची शक्यता बळावल्याने शरद पवारांसह त्यांच्या राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढल्याचे बोलले जात आहे.
खासदार अमोल कोल्हे यांची मोठी प्रतिक्रिया
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात एकाचवेळी दोन उमेदवारांना तुतारीचे चिन्हे मिळाल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीला आपला पराभव दिसत असल्यामुळेच अशा प्रकारे रडीचे डाव खेळले जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. तरीही बारामतीचा मतदार सूज्ञ आहे आणि तो तुतारी वाजवणारा माणूस चिन्हावरच मत देईल, असेही त्यांनी म्हटले आहे.