महायुतीचे टेंशन वाढले ! रावेरच्या तुलनेत जळगाव मतदारसंघात कमी मतदान
जळगाव टुडे । राज्यातील जळगाव, रावेर, नंदुरबार, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड अशा 11 लोकसभा मतदासंघासाठी आज सोमवारी (ता.13)सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, सकाळी 11 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी उपलब्ध झाली असून, रावेर मतदारसंघात 19.03 टक्के आणि जळगाव मतदारसंघात जेमतेम 16.59 टक्के मतदान झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. (Loksabha Election)
निवडणूक आयोगाकडून प्राप्त माहितीनुसार, सकाळी नऊ वाजेपर्यंत जळगाव मतदारसंघात 6.14 टक्के तसेच रावेरमध्ये 7.14 टक्के मतदान झाल्याचे दिसून आले होते. मतदानाची टक्केवारी लक्षात घेता सकाळपासून रावेरमध्ये बऱ्यापैकी उत्साह तर जळगावमध्ये थोडे निरूत्साहाचे वातावरण दिसत होते. सकाळची कामे आटोपल्यानंतर तरी मतदारांची गर्दी होईल आणि मतदानाचा टक्का वाढेल, अशी आशा त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडी बाळगून होती. मात्र, सकाळी 11 वाजेपर्यंत देखील फार काही उत्साहवर्धक परिस्थिती मतदान केंद्रांवर दिसून आलेली नाही. जळगाव लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत जेमतेम 16.89 टक्केच मतदान झाले आहे. तुलनेत रावेरमध्ये 19.03 टक्के मतदान झाल्याचे दिसून आले आहे.
कमी मतदानाने महायुतीचे टेंशन वाढले
माजी खासदार उन्मेश पाटील आणि पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे महायुतीने जळगावची ही जागा खूपच प्रतिष्ठेची केली असून, ती सुमारे पाच लाखांच्या मताधिक्याने जिंकण्याचा विश्वास देखील भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे. प्रत्यक्षात जळगावमधील कमी मतदानाने महायुतीचे टेंशन वाढल्याचे बोलले जात आहे.