मंत्री अनिल पाटील यांच्या ‘त्या’ वक्तव्याने अमळनेरमध्ये स्मिता वाघ यांचे टेंशन वाढले !
जळगाव टुडे । लोकसभेच्या रणधुमाळीचा प्रचार ज्वर शिगेला पोहोचलेला असताना, महाविकास आघाडीसह महायुतीकडून जाहीर सभांसह तालुकानिहाय मेळाव्यांचा धडाका सुरू आहे. दरम्यान, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतानाच आपापसातील मतभेदावर जाहीर भाष्य करण्यासही अनेक नेते मागेपुढे पाहत नसल्याचे दिसून येत आहे. बोलण्याच्या ओघात काहीजण तर असे काही खळबळजनक वक्तव्य करीत आहेत,की त्यामुळे लोकसभेच्या उमेदवारांचेच टेंशन वाढू लागले आहे. अमळनेरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यातही त्याचा प्रत्यय आला. (Loksabha Election)
जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार श्रीमती स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ अमळनेर येथे महायुतीच्या घटक पक्षांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा पार पडला. याप्रसंगी भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह माजी आमदार शिरीष चौधरी आदी उपस्थित होते. दरम्यान, सन 2019 च्या निवडणुकीत अमळनेरमधून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेले मंत्री अनिल पाटील यांनी तत्कालिन भाजप उमेदवार शिरीष चौधरी यांना डिवचण्याच्या प्रयत्नात लोकसभा उमेदवार स्मिता वाघ यांचेच टेंशन वाढविण्याचे काम केले.
मंत्री अनिल पाटील यांनी मागील विधानसभा निवडणुकीची सर्व गुपीते केली उघड
मेळाव्यास उपस्थित सर्वच मान्यवरांची दणदणीत भाषणे झाली. दरम्यान, मंत्री अनिल पाटील हे बोलण्यासाठी उभे राहिले. महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांना निवडून आणण्याचे आवाहन करून मंत्री पाटील यांनी भाषणात असे काही वक्तव्य केले, की मेळाव्याच्या ठिकाणी चांगलीच खळबळ उडाली. “जर कदाचित मी आमदार झालो नसतो, तर आज स्मिता वाघ खासदार झाल्या नसत्या. सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मला आमदार बनविण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली आता त्यांना खासदार बनविण्यासाठी मी मेहनत घेणे क्रमप्राप्त आहे,” असे बोलून भाजप नेते गिरीश महाजन आणि अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत मंत्री अनिल पाटील यांनी मागची सर्व गुपीते उघड करून स्मिता वाघ यांच्या अडचणीत वाढ केली. श्रीमती वाघ यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला त्यावेळी मदत केल्यामुळेच भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचे त्यांच्या त्या वक्तव्याने उघड झाले. आता माजी आमदार शिरीष चौधरी हे मंत्री अनिल पाटलांच्या वक्तव्याला किती गांभीर्याने घेतात, त्याचा किती मोठा फटका स्मिता वाघ यांना अमळनेर तालुक्यात बसतो, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.