उज्ज्वल निकम यांनी मुंबादेवीसमोर फोडला लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ
Jalgaon Today : भारतीय जनता पार्टीकडून उत्तर-मध्य मुंबईसाठी लोकसभेची (Loksabha Election ) उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज रविवारी (ता.28) ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी मुंबादेवीसमोर प्रचाराचा नारळ फोडला. माझ्या आयुष्यातील दुसऱ्या राजकीय इनिंगची सुरुवात झाली आहे. संसदेत सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याची ताकद मला मिळो, यासाठी आपण मुंबादेवीचे आशीर्वाद घेतल्याचेही त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना नमूद केले.
”मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील लोकांचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी माझी निवड करण्यात आली. लोकांचे प्रश्न संसदेत मांडण्याची ताकद मला मिळो यासाठी मी दर्शन घेतले. तसेच न्यायालयात मी समोरच्या पक्षाला कधीही कमी लेखले नाही. त्यामुळे वर्षा गायकवाड या ज्येष्ठ राज्यकर्त्या आहेत याची मला कल्पना आहे. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे आणि वीर सावरकर यांना अभिवादन करून मी माझ्या प्रचाराची सुरुवात करत आहे. प्रत्येक गोष्टीतून वाईट अर्थ काढू नये. पूनम महाजन यांना पक्षाकडून कदाचित नवी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्याबाबत मी आताच काही सांगू शकत नाही. प्रचारादरम्यान मला मतदान का करावे, माझा पक्ष कसा चांगला आहे, हे मी जनतेला सांगणार आहे”, असेही उज्ज्वल निकम म्हणाले. त्यांचा सामना लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याशी होणार आहे.