“ज्याप्रमाणे त्यांनी पारोळा शहराचे वाटोळे केले त्याप्रमाणे ते जळगाव लोकसभा मतदारसंघाचेही वाटोळे करतील”
माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांचा आरोप
Jalgaon Today : “आजचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हे पारोळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. त्यांनी पारोळा नगरपालिकेचे नियोजन व्यवस्थित केले नाही, जे पारोळा शहर व तालुका सांभाळू शकले नाही ते काय जिल्ह्याचे नेतृत्व करतील. ज्या प्रमाणे त्यांनी पारोळ्याचे वाटोळे केले त्याप्रमाणे ते जळगाव मतदारसंघाचेही वाटोळे करतील. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत (Loksabha Election) चुकीच्या लोकांना कोणीच मतदान करू नये, असे आवाहन पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांनी मतदारांना केले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर पारोळा शहराचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांनी जनतेशी एका मुलाखतीच्या माध्यमातून थेट संवाद साधला आहे. त्याद्वारे त्यांनी पारोळा शहरातील सध्याच्या अनागोंदी कारभारावर व तेथील नेतृत्वावर घणाघाती टीका देखील केली आहे.
चुकीच्या माणसांसोबत मला भारतीय जनता पक्षात कधीच काम करायचे नव्हते
“भाजपामध्ये प्रवेश करण्याची माझी पूर्वीपासूनच इच्छा होती. मात्र, समीकरणे जुळत नव्हती. काही चुकीची लोक त्या पक्षात घुसली होती. त्यामुळे काम करण्याची इच्छा होत नव्हती. नाहीतरी माझे आयुष्य बालपणापासून संघातच गेले आहे. काही कारणास्तव चुकीच्या लोकांमुळे दूर गेलो होतो. आता परत भारतीय जनता पार्टीत आलो आहे आणि शेवटपर्यंत याच पक्षात राहणार आहे. कोण कोठे गेले, याबद्दल बोलून मला कोणाला महत्व द्यायचे नाही. मी त्यांच्यामुळेच भाजपामध्ये जात नव्हतो. त्यांच्यासारख्या चुकीच्या माणसांसोबत मला भाजपाचे काम करायचे नव्हते. म्हणून मी गेलो नाही, मात्र आता ते गेल्यानंतर मला वाटलं भाजपामध्ये जायचे आहे, आपले सगळे जुने लोक तिथे आहेत. त्यासाठी मी ज्यांनी आयुष्य भाजपात घालवले, पक्ष घडविला त्या जुन्या लहान व मोठ्या कार्यकर्त्यांशी चर्चा देखील केली”, असेही श्री. शिरोळे यांनी बोलून दाखवले.
लोकांच्या जीवाशी चाललेला खेळ वेळीच थांबवला गेला पाहिजे
“महाविकास आघाडीचे आजचे लोकसभेचे जे उमेदवार आहेत, ते पारोळ्याचे नगराध्यक्ष राहिले आहेत. सध्या पारोळा शहरात 15 दिवसाआड पाणी पुरवठा होतो आहे. वास्तविक ज्या वेळी पारोळा शहरात पाईपलाईन नव्हती, त्यावेळी आम्ही साठवण बंधाऱ्यात साठविलेले पाणी नागरिकांना चार दिवसाआड फिल्टर करून देत होतो. कठीण परिस्थितीतही आम्ही नागरिकांची तहान भागवित होतो. मात्र, हल्ली धरणात भरपूर पाणी साठा असतानाही सध्याच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. मी मुख्याधिकाऱ्यांना सुद्धा भेटलो आणि बोललो की तुम्हाला नियोजन जमत नसेल तर मला सांगा मी पंधरा दिवसाचे पाणी सात दिवसांवर आणून दाखवतो. आताचे सत्ताधारी सांगतात की लोकसंख्या वाढल्यामुळे पाणी कमी पडत आहे. मग तुम्ही आठ दिवसाआड पाणी सोडण्याची तर बोंब पाडा. जास्त दिवसांच्या कालावधीनंतर पाण्यात जंतू पडतात. लोकांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवला गेला पाहिजे. प्रत्येकजण घरात फिल्टर ठेवू शकत नाही. आज पारोळ्यातील सर्व गटारी तुंबल्या आहेत, त्यामुळेही नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे”, असाही आरोप माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांनी केला.