ब्रेकींग न्यूज…उत्तर मध्य मुंबईतून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपाची उमेदवारी जाहीर !
Jalgaon Today : दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसकडून माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली होती. विरोधकांनी उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपाच्या गोटातही उमेदवार ठरविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या होत्या. अखेर आज त्या जागेसाठी उज्ज्वल निकम यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. ज्येष्ठ विधीज्ञ श्री.निकम हे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याचे मूळ रहिवासी आहेत. (Loksabha Election)
भाजपने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रख्यात कायदे पंडित उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देऊ केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात कोण उमेदवार असणार, ही चर्चा आता संपुष्टात आली आहे. या मतदारसंघातील विद्यमान खासदार आणि दोन वेळा निवडणूक लढविणाऱ्या पूनम महाजन यांचा पत्ता अखेर कापण्यात आला आहे. १९९३ चा मुंबई बाँबस्फोट खटला, मुंबईवरील अतिरेकी हल्ला यासह अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये अतिरेक्यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होण्यासाठी निकम यांनी राज्य सरकारची यशस्वीपणे बाजू मांडली. तर खैरलांजी, सोनई येथील दलितांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये आरोपींना कठोर शासन घडविण्यासाठी निकम यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. ही सर्व पार्श्वभूमी पाहता निकम यांना उमेदवारी जाहीर होईल, अशी चर्चा होती. त्यानुसार उमेदवारी जाहीर करून भाजपने सगळ्यांना आश्चर्याचा जोरधार धक्का दिला आहे.