“कमळाचे बटन दाबल्यावर झटका इटलीला लागला पाहिजे”
अकोल्यातील सभेत अमित शहा यांनी सोनिया गांधींवर केली टीका
Jalgaon Today : लोकसभेच्या (Loksabha Election) आगामी निवडणुकीत कमळाचे बटन इतक्या जोरात दाबा की त्याचा झटका इटलीला लागला पाहिजे, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मंगळवारी (ता.23) काँग्रेसच्या सोनिया गांधी यांच्यावर टीका केली. याव्यतिरिक्त उद्धव ठाकरेंना आपल्या मुलाशिवाय दुसरे काहीच दिसत नसल्याचे बोलून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शेती प्रश्नी टिकेची झोड अमित शहा यांनी उठवली.
अकोला लोकसभा (Loksabha Election) मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत केंद्रीय मंत्री श्री.शहा बोलत होते. यावेळी त्यांनी सोनिया गांधींपासून उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, अमित शहा यांनी काँग्रेस पक्षाकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर सभेच्या ठिकाणी बोलताना दिले. भारतीय जनता पार्टी असेपर्यंत या देशात एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण कायम राहील, किंबहुना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी असल्याचा दावा सुद्धा त्यांनी आपल्या भाषणातून केला.
शरद पवार हे मनमोहन सिंग पंतप्रधान असताना केंद्रात कृषीमंत्री होते. त्या दहा वर्षांच्या काळात सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किती निधी दिला, असा सवाल श्री.शहा यांनी उपस्थित केला. माझ्या प्रश्नाचे उत्तर शरद पवार देणार नाहीत. कारण त्या दहा वर्षात महाराष्ट्रात मनमोहन सिंग सरकारने फक्त एक लाख 91 हजार कोटी रूपये दिले आहेत. तर मोदी सरकारने आताच्या दहा वर्षात सुमारे सात लाख 15 हजार कोटी रूपये दिले आहेत, असाही दावा केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केला.