आवाज कुणाचा ? जळगावमध्ये महाविकास आघाडी उद्या बुधवारी तर महायुती गुरूवारी अर्ज दाखल करणार
दोन्ही गटांकडून लोकसभा निवडणुकीच्या जोरदार शक्तीप्रदर्शनाची सुरू आहे तयारी
Loksabha Election : काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट तसेच मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीचे रावेर आणि जळगावमधील दोन्ही उमेदवार हे उद्या बुधवारी (ता.24) अर्ज दाखल करणार असल्याचे वृत्त आहे. तर भाजप-शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार, रासपच्या महायुतीचे दोन्ही उमेदवार हे गुरूवारी (ता.25) उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, महाविकास आघाडी व महायुतीकडून यानिमित्त जोरदार शक्तीप्रदर्शनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी 25 एप्रिलपर्यंतच अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने, जळगाव जिल्ह्यातील भाजप-शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार, रासपच्या महायुतीने शेवटच्या दिवशी रावेर तसेच जळगावमधील दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याचे नियोजन केले आहे. यावेळी भाजप नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करताना महायुतीकडून सुमारे एक लाख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी देखील करण्यात आली आहे.
महाविकास आघाडी देखील आहे महायुतीवर मात करण्याच्या तयारीत
रावेरमधील उमेदवार श्रीराम पाटील आणि जळगावमधील उमेदवार करण पवार यांचे उमेदवारी अर्ज बुधवारी दुपारी भरल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच महाविकास आघाडीची जाहीर सभा घेण्यात येणार आहे. त्याठिकाणी उबाठाच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे तसेच खासदार संजय राऊत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांची भाषणे होतील. दरम्यान, ठाकरे आणि राऊत यांचे दौरे निश्चित झाल्याची माहिती संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी दिली आहे. जयंत पाटील यांचा दौरा निश्चित झालेला नसला तरी त्यांनी जळगावमध्ये बुधवारी येण्यास होकार दिल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी म्हटले आहे.