ब्रेकींग न्यूज…शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचे उमेदवार !
खासदार संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ
Loksabha Election : “एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली एक मोठा गट पक्षातून बाहेर पडल्यानंतर ठाकरेच्या शिवसेनेची आधीच दोन शकले झाली आहेत. शिल्लक राहिलेला पक्ष एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान संबंधित पक्ष श्रेष्ठींना पेलावे लागत आहे. त्यानंतरही लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीची सत्ता आल्यावर उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असू शकतात आणि त्यांना शरद पवार यांच्यासह इतर अनेक नेते पाठींबा देतील”, असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
सांगली जिल्ह्यात पत्रकारांशी संवाद साधताना खासदार श्री.राऊत यांनी थेट उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधान पदाच्या संभाव्य उमेदवारीविषयी भाष्य करून अनेकांना आश्चर्याचा धक्काच दिला. याशिवाय इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाचे अनेक चांगले चेहरे असल्याचा दावा देखील त्यांनी केला. तसेच इंडिया आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्राला नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर कुठे बिघडले, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. यापूर्वी शरद पवारांना पंतप्रधान पदाची संधी मिळण्याची आशा आम्ही बाळगून होतो. पण त्यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याला संधी मिळाली नाही. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदावर काम करण्याची संधी मिळाल्यावर शरद पवार त्यांच्या नावाला पसंती देतील, असेही खासदार संजय राऊत यांनी बोलून दाखवले.
विशेष म्हणजे इंडिया आघाडीला लोकसभा निवडणुकीत 300 पेक्षा जास्त आणि महाराष्ट्रात इंडिया आघाडीला 35 पेक्षा जास्त जागा मिळतील. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भोपळा सुद्धा फोडता येणार नाही. कदाचित त्यांच्या पक्षाचे भविष्यात भाजपमध्ये विलिनीकरण होईल, असेही भाकीत खासदार संजय राऊत यांनी सांगली येथे प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.