राज्यात लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत दोन तासात 6.98 टक्के मतदान
Loksabha Election : राज्यातील पहिल्या टप्प्यात होत असलेल्या नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली- चिमूर आणि भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज शुक्रवारी (ता.19) पहिल्या दोन तासात 6.98 टक्के मतदान झाले. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहकुटुंब तसेच प्रफुल्ल पटेल, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी रांगा लावणाऱ्या मतदारांमध्ये चांगला उत्साह दिसून आला. चंद्रपूरमध्ये सकाळपासून उन्हाचा चटका जाणवत असतानाही मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्याचे दिसून आले. गडचिरोलीमध्ये खास महिलांसाठी पिंक पोलिंग बूथ उभारण्यात येऊन मतदान केंद्रांच्या बाहेर सुरक्षेसाठी महिला पोलिसांची नियुक्ती करण्यात आल्याचे दिसून आले. चामोर्शी तालुक्यातील सुंदरनगरच्या एका मतदान केंद्रावर आशा दीदींकडून मतदारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आनंदवनातील 1200 मतदारांसाठी विशेष मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. कुष्ठरोगी,दिव्यांग,अबाल वृद्ध,अंध,कर्णबधीर मतदार तिथे मतदानाचा हक्क बजावतील. हेमलकसा येथेही 144 कुटुंबांनी त्यांचे मॉडेल मतदान केंद्र सजवण्यासाठी स्वेच्छेने काम केले. त्यामुळे तेथील मतदान केंद्राचा चेहरा मोहराच बदलून गेला. नागपूरमध्ये जयमाता प्रा. शाळा, दिघोरी या मतदान केंद्रावर तब्बल 1 तास 10 मिनिट उशीराने मतदान सुरु झाल्यामुळे मतदान केंद्रावर मोठया प्रमाणात गर्दी झाली होती.
चंद्रपुरात मतदारांसाठी आकर्षक बक्षिसे
चंद्रपुरात निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘तुमचे मत द्या आणि लकी ड्रॉ मध्ये आकर्षक बक्षिसे जिंका’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान करून सेल्फी अपलोड करावा लागणार आहे. पहिल्या तीन क्रमांकाचे आकर्षक बक्षीसे लाखोंची आहे. प्रथम बक्षीस 1 लक्ष 60 हजार रुपये किंमतीची बाईक,आरटीओ आणि विमा खर्च समाविष्ट करण्यात आले आहे. इतर बक्षिसांमध्ये 35 हजाराची ई-सायकल आणि 20 हजार रूपयांचा ॲन्ड्राईड फोन, अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत.