लोकसभा उमेदवाराच्या प्रचारासाठी जेव्हा दोन्ही बायका उतरल्या मैदानात
loksabha Election : निवडणूक कोणतीही असो संबंधित उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांच्या कुटुंबातील लहान-मोठे सर्व सदस्य सहभागी होतात. मात्र, गुजरात राज्यातील एका मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचा प्रचार त्यांच्या दोन्ही बायका सांभाळत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे दोघीजणी मतदारसंघात फिरून आपल्या नवरोबाचा प्रचार मोठ्या उत्साहाने करत आहेत.
गुजरातमधील भरूच लोकसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीकडून चैतर वसावा हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर भाजपचे नेते मनसुख वसावा यांना उमेदवारी मिळाली आहे. मागील काही वादामुळे आम आदमी पार्टीचे उमेदवार चैतर वसावा यांना कोर्टाच्या आदेशावरून मतदारसंघातील काही भागात फिरकण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्या भागात जाऊन पतीच्या प्रचाराची धुरा सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्या दोन्ही बायकांवर येऊन ठेपली आहे.
लोकसभा उमेदवार चैतर वसावा यांच्या एका पत्नीचे नाव शकुंतला आणि दुसऱ्या पत्नीचे वर्षा वसावा असे आहे. कधीकाळी दोघीजणी शासकीय कर्मचारी होत्या. मात्र, 2022 मध्ये त्यांचे पती चैतर वसावा हे विधानसभेची निवडणूक लढले, तेव्हा पतीला निवडून आणण्यासाठी दोघींनी नोकरीचा राजीनामा देऊन प्रचारात सक्रीय सहभाग घेतला होता. गुजरात राज्यातील आदिवासी समुदायात एकापेक्षा जास्त विवाहाची परवानगी आहे. त्यानुसार चैतर वसावा यांनी शकुंतला आणि वर्षा यांच्याशी विवाह केला आहे. तिघेही एकाच घरात मुलांसह गुण्यागोविंदाने संसार करतात.