चर्चा तर होणारच ! ग्रामीण भागातील महिलांना जेव्हा भावतो स्मिता वाघ यांचा साधेपणा
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी खऱ्या अर्थाने उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच सुरू होणार असली, तरी जळगावमधील भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी अर्धाअधिक मतदारसंघ केव्हाच पिंजून काढला आहे. त्यातही मतदारांच्या गाठीभेटी घेताना त्यांच्यातील साधेपणा ग्रामीण भागातील महिला वर्गाला सध्या खूपच भावत असून, खेडोपाडी सध्या सगळीकडे पापड, कुरड्या, वडे तयार करण्याची लगबग सुरू असताना स्मिताताई जेव्हा मदतीसाठी पुढे सरसावतात तेव्हा महिलांना त्या आपल्यापैकीच कोणी एक असल्याची अनुभूती आपोआप येते.
लोकसभा निवडणुकीच्या धांदलीत कमी दिवसात जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचणे कठीण असले तरी ग्रामीण भागात काम केल्याचा मोठा अनुभव गाठीशी असलेल्या स्मिता वाघ यांनी ते आव्हान देखील लीलया पेलले आहे. निवडणूक कालावधीत अनेक उमेदवार सहसा मोठ्या लोकसंख्येच्या गावांना धावती भेट देऊन शक्य तितक्या लवकर प्रचाराचे कार्य आटोपताना दिसतात. मात्र, स्मिता वाघ या अशा एकमेव उमेदवार आहेत, ज्यांचा भर लहानात लहान गावाला भेट देऊन तेथील मतदारांशी हितगूज साधण्यावर जास्तकरून राहिला आहे. त्यामुळे त्या कोणत्याही गावाला जेव्हा भेट देतात तेव्हा एखादा मुख्यमंत्री आपल्या गावाला भेट देण्यासाठी आला की काय, अशीच काही भावना ग्रामीण मतदारांमध्ये असते. त्यातही जळगावमध्ये खासदारकीची निवडणूक लढविणाऱ्या त्या पहिल्या उमेदवार असल्याने महिला मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल बरीच सहानुभूती दिसून येते.
पदाचा कोणताही बडेजाव न मिरवता महिलांशी आपुलकीने संवाद
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक वर्ष जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय राहिलेल्या स्मिता वाघ यांना ग्रामीण भागात कोणी ओळखत नाही, असा विरळाच. आताही भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर त्या ग्रामीण भागात गेल्यावर विशेषतः महिलांना आपलीच कोणी जीवाभावाची सखी आपल्या भेटीसाठी आली आहे, असे मनोमन वाटत असल्याचा प्रत्यय येतो. एकतर स्मिता वाघ यांच्या वागण्यात आणि बोलण्यात खूपच साधेपणा असतो आणि त्या गावखेड्यात गेल्यानंतर यापूर्वी भूषविलेल्या मोठ्या पदांचा कोणताही बडेजाव मिरवित नाही. सर्वांशी अगदी आपुलकीने व सहजतेने संवाद साधतात. त्यामुळे खासकरून महिला मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल असलेला आदरभाव आणखी द्विगुणीत होतो.