सून जिंकणार अन् लेक हरणार ? बारामतीची जागा शरद पवारांच्या हातातून जाण्याची शक्यता
इंडिया टीव्ही-सीएनएक्स ओपिनियन पोलचा अंदाज
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ‘इंडिया टीव्ही-सीएनएक्स’ ओपिनियन पोलचा अंदाज जाहीर झाला असून, त्यामाध्यमातून बारामतीच्या संदर्भात अतिशय धक्कादायक भाकीत वर्तविण्यात आले आहे. ज्या जागेसाठी काका व पुतण्याने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे, ती बारामतीची जागा पराभव पत्कारावा लागल्याने शरद पवारांच्या हातातून जाऊ शकते, असाही अंदाज सदरच्या ओपिनियन पोलमधून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असतानाच्या काळात देखील शरद पवार यांना लोकसभेच्या मागील काही निवडणुकांमध्ये अतिशय माफक यश मिळाले होते. आताच्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पुतण्या अजित पवार यांनी बंड केल्याने घड्याळाचे चिन्ह सुद्धा शरद पवारांच्या हातून गेले आहे. दरम्यान, पक्षाचे अनेक मातब्बर नेते राष्ट्रवादी सोडून बाहेर पडल्यानंतर शरद पवार हे तुतारीच्या चिन्हावर प्रथमच लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. अशा या बिकट परिस्थितीत नेमके त्यांच्यासाठी धक्कादायक मानले जाणारे अंदाज ओपिनियन पोलच्या माध्यमातून वर्तविण्यात आले आहेत. बारामतीत यंदा अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे निवडणूक मैदानात उतरल्या आहेत. अर्थातच, नणंद आणि भावजय यांच्यातील या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले आहे.
मागील निवडणुकांपेक्षा यंदाच्या निवडणुकीत शरद पवारांना मिळू शकतात कमी जागा
दरम्यान, ‘इंडिया टीव्ही-सीएनएक्स’ ओपिनियन पोलच्या माध्यमातून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मागील निवडणुकांपेक्षा कमी जागा मिळू शकतात. महाराष्ट्रातील सातारा, माढा आणि शिरूर वगळता कुठेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी वाजणार नाही. खुद्द त्यांचा बारामती हा हक्काचा आणि पारंपरिक मतदारसंघ त्यांच्या हातून निसटेल, असेही निवडणूक पूर्व अंदाजात म्हटले आहे. राज्यातील महाविकास आघाडीत शरद पवारांच्या शब्दाला महत्व असले तरी त्यांच्या पक्षाच्या वाट्याला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 48 पैकी फक्त 10 जागा आल्या आहेत. त्यापैकी मोजून तीनच जागा त्यांच्या पदरी पडण्याचा अंदाज ‘इंडिया टीव्ही-सीएनएक्स’ ओपिनियन पोलच्या माध्यमातून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक शरद पवारांसाठी खूपच आव्हानात्मक असू शकेल, असे बोलले जात आहे.