आयारामांना थेट लोकसभेची उमेदवारी दिल्याने जळगावच्या शिवसेना ठाकरे गटात दुफळी ?
निष्ठावान पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची चर्चा
Loksabha Election : लोकसभेच्या जळगाव मतदारसंघात भाजपाकडून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाला चांगला तुल्यबळ उमेदवार शोधताना खूप कसरत करावी लागली. सेना नेत्यांनी त्यासाठी तब्बल आठवडाभर इच्छुकांच्या मुलाखती देखील घेतल्या. प्रत्यक्षात पक्ष श्रेष्ठींनी लोकसभेची उमेदवारी देताना पक्षाच्या निष्ठावानांचा विचार न करता आयारामांना प्राधान्य दिले. याकारणामुळे जळगावमध्ये शिवसेना ठाकरे गटात मोठी दुफळी निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. पक्षाचा एक मोठा गट नाराजी दाखवत नसला तरी काहीसा अलिप्त राहत असल्याचेही बोलले जात आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा पहिल्यांदा शिवसेना ठाकरे गटाला मिळाल्यानंतर त्यासाठी पक्षाचे निष्ठेने काम करणाऱ्या मराठा समाजाच्या दोन उमेदारांची नावे पुढे आली होती. त्यात पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. हर्षल माने आणि जळगाव शहर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांचा प्रामुख्याने समावेश होता. नंतर पक्षात आलेल्या अमळनेरच्या ॲड. ललिता पाटील यांचेही नाव त्यात समाविष्ठ झाले. दरम्यान, जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून उमेदवाराच्या नावाची निश्चिती करण्यासाठी मुंबईत मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली. त्यातही डॉ. हर्षल माने आणि कुलभूषण पाटील तसेच ॲड. ललिता पाटील यांच्या नावावर चर्चा करण्यात आली. जळगाव मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य असल्याने ठाकरे गटाकडून मराठा समाजाचाच उमेदवार देण्यात येणार असला तरी त्याची निवडून येण्याची क्षमता आणि पक्षातील काम हे मुद्दे देखील तितकेच महत्वाचे असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले. त्यानुसार शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभेचा उमेदवार निश्चित होत नाही तोपर्यंत डॉ. हर्षल माने आणि कुलभूषण पाटील यांची दोघांची नावे आघाडीवर देखील होती. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह सुद्धा दिसून येत होता.
ऐनवेळी पक्षात आलेल्यांना संधी मिळाल्याने जुन्या निष्ठावानांचा मूडच गेला
दरम्यान, मुंबईतील सिद्धीविनायकाच्या चरणी नतमस्तक होऊन मुलाखती देऊन आलेल्या आणि मेरीटमध्ये असलेल्या जुन्या निष्ठावानांपैकी ठाकरे शिवसेना गटाकडून डॉ. हर्षल माने आणि कुलभूषण पाटील यांची नावे अखेरपर्यंत चर्चेत होती. मात्र, कुलभूषण पाटील हे लोकसभा निवडणूक लढवण्यास जास्त इच्छुक नसल्याने व जळगावची विधानसभा निवडणूक लढवण्यावर त्यांचा जास्त कल असल्याने त्यांचे नाव नंतर मागे पडले. त्यानंतर मात्र पारोळा तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेना ठाकरे गटाचे जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. हर्षल माने यांच्या एकमेव नावावर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले. पक्षातील जुन्या निष्ठावान शिवसैनिकांनी देखील डॉ. हर्षल माने यांच्याच नावावर जोर दिला. प्रत्यक्षात ठाकरे गटाने ऐनवेळी पक्षात आलेल्यांना थेट लोकसभा उमेदवारीची संधी दिली आणि जुन्या निष्ठावान शिवसैनिकांचा मूडच गेला. तेव्हापासूनच ठाकरेंच्या शिवसेनेत जळगाव मतदारसंघात उभे दोन गट पडल्याचे सांगितले जात असून, डॉ.हर्षल माने समर्थकांनी निवडणुकीत कोणतेच सहकार्य न करण्याची भूमिका देखील घेतली आहे आणि त्यामुळे शिवसेना ठाकरे गटासमोर मोठा पेच निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. पक्षाचा बऱ्यापैकी प्रभाव असलेल्या जळगाव शहर तसेच पारोळा व एरंडोल तालुक्यात त्याचा मोठा फटका लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला बसण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे.