महाराष्ट्रातील लोकसभेच्या भाजप उमेदवारांची नावे ‘या’ दिवशी जाहीर होणार
Loksabha Election : भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी केव्हा जाहीर होते, त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कारण त्यात महाराष्ट्रातील बऱ्याच उमेदवारांची नावे असण्याची शक्यता आहे. त्यानंतर शिंदे गट व अजित पवार गट हे देखील आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करतील, असे बोलले जात आहे. दरम्यान, भाजपची दुसरी यादी मंगळवारी किंवा बुधवारी जाहीर होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
भाजप-राष्ट्रवादी तसेच शिंदे सेनेच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीची महत्वपूर्ण बैठक सोमवारी दिल्लीत पार पडली. त्यात महाराष्ट्रात 30 पेक्षा एकही जागा कमी घ्यायची नाही, असा उच्चार भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी केला. शिंदेसेनेला 12 आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला 06 जागा दिल्या जातील. मात्र शिंदेसेनेने 12 पैकी 06 खासदारांना पुन्हा उमेदवारी न देता त्यांच्या जागी नवे उमेदवार द्यावेत, या अटीवर भाजप ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे.
मंगळवारच्या बैठकीत होऊ शकतो जागा वाटपाचा अंतिम निर्णय
दरम्यान, आम्हाला इतक्याच जागा पाहिजे असे ठणकावून सांगणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता भाजप पक्ष श्रेष्ठींपुढे थोडे नमते घेतले आहे. आमच्या अटी मान्य केल्याशिवाय जागा वाटपाची चर्चा पुढे जाणारच नाही, असा पवित्रा भाजपने घेतल्यामुळे एकनाथ शिंदेंना आता उमेदवार बदलण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. या अनुषंगाने मंगळवारी (ता.12) भाजपसह अजित पवार गट तसेच शिंदे सेनेच्या नेत्यांची दिल्लीत आणखी एक महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. त्यात भाजपच्या अटी मान्य करण्याबाबत शिंदे, पवार निर्णय घेतील व त्यानंतर जागावाटप जाहीर होईल,अशी माहिती एका ज्येष्ठ मंत्र्याकडून मिळाली आहे.