प्रचार सभा राहुल गांधींची…व्यासपीठावर फोटो मात्र भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा !
काँग्रेसची झाली फजिती, नंतर फोटो बदलला
Loksabha Election : निवडणुकीच्या रणधुमाळीत एखादी लहान चूक झाली तरी त्याचे मोठे परिणाम संबंधित उमेदवारासह पक्ष नेत्यांना भोगावे लागतात. प्रसंगी फजिती झाल्याने मान खाली घालावी लागते. असाच एक प्रकार मध्य प्रदेशात घडला असून, काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी राहुल गांधी यांची सभा त्याठिकाणी आयोजित केली होती. दरम्यान, व्यासपीठावर लावलेल्या फ्लेक्सवर थेट भाजप उमेदवाराचाच फोटो झळकल्याने काँग्रेसची तिथे चांगलीच फजिती झाली. धावाधाव करून नंतर भाजप उमेदवाराचा फोटो झाकून त्याजागी काँग्रेसच्या आमदाराचा फोटो चिकटवून सारवासारव करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार मध्य प्रदेशातील मांडला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार ओंकार सिंह मरकाम यांच्या प्रचारार्थ धनोरा येथे राहुल गांधींची सभा आयोजित केली होती. मरकाम यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांना तिथे मैदानात उतरविले आहे. त्यामुळे राहुल गांधी हे सभेच्या ठिकाणी ओंकार सिंह मरकाम यांच्यासाठी मते मागून भाजप उमेदवार फग्गनसिंह कुलस्ते यांच्या विरोधात बोलणार होते. परंतु, सभेच्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या व्यासपीठावरील फ्लेक्सवर काँग्रेस उमेदवाराचा फोटो न लावता थेट भाजप उमेदवार फग्गन सिंह कुलस्ते यांचा फोटो लावून आयोजकांनी चांगलाच सावळा गोंधळ घातला. ज्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना राहुल गांधी सभास्थळी येण्यापूर्वी दरदरून घाम फुटला.
अखेर फोटो बदलून चूक सुधारली
राहुल गांधी यांच्या सभास्थळावरील व्यासपीठावर भाजप उमेदवाराचा फोटो चुकून लागलेला असला, तरी खाली त्यांचे नाव नव्हते. ती संधी साधून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी धावपळ करून त्याजागी आमदार रजनीश हरवंश यांचे छायाचित्र घाईघाईत चिकटवले. प्रसंगावधान राखून फोटोची अदलाबदल करण्यात यश आल्यानंतर काँग्रेसच्या उमेदवारासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, घडल्या प्रकाराने त्यांची चांगलीच फजित झाली. त्याची सगळीकडे चर्चा देखील ऐकण्यास मिळाली.