राजकारणाचा नाद खुळा…भाजपच्या जिल्हाध्यक्षाने करोडो रूपयांच्या संपत्तीला लावला चुना !
50 एकर शेती विकली, आता उरली फक्त 66 गुंठे जमीन
Loksabha Election : राजकारण मग ते ग्रामपंचायतीचे असो किंवा लोकसभेचे….पैसा आणि प्रतिष्ठेसाठी निवडणुका लढविणाऱ्यांची संख्या कमी नसते. राजकारणाच्या नादात बरेच जण मालामाल आणि कंगाल झाल्याची उदाहरणे सुद्धा आहेत. अशाच एका भाजपच्या जिल्हाध्यक्षाने राजकारणात नशीब आजमावण्यासाठी करोडो रूपयांच्या संपत्तीला चुना लावल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी आतापर्यंत सुमारे 50 एकर बागायती शेती विकली असून, फक्त 66 गुंठे जमीन त्यांच्याकडे शिल्लक राहिली आहे.
ॲड. शिवाजीराव जाधव, असे त्यांचे नाव आहे. पेशाने वकील असलेले ॲड. जाधव हे भारतीय जनता पार्टीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष होते. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपानुसार हिंगोलीची जागा ही शिवसेनेकडे गेली असून, त्याठिकाणी बाबुराव कदम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, त्या जागेसाठी ॲड.जाधव यांनी हट्ट धरला आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी भाजप नेते गिरीश महाजन यांनीही बरेच प्रयत्न केले. पण काहीही करून हिंगोलीची जागा लढविण्यावर ॲड.जाधव हे ठाम आहेत. निवडणूक हरल्यावर पुन्हा दिल्लीत जाऊन वकीलीचा व्यवसाय करेल, पण माघार घेणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे भाजपसह सेनेच्या नेते त्यांच्यापुढे हतबल झाले आहेत.
“वसमत येथे असलेली प्रॉपर्टी विकली, 50 एकर बागायती जमीन विकली. त्याचप्रमाणे नांदेड, पुणे, नोएडा, दिल्ली येथील करोडो रुपयांची संपत्ती विकली. माझ्या नावावर आता फक्त वडिलोपार्जित 66 गुंठे जमीन शिल्लक राहिली आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोन आला. पण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. गेल्या 10 ते12 वर्षांपासून मी हिंगोली विधानसभा तसेच वसमत विधानसभा परिसरात काम करत आहे. 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण, या न्यायाने मी आतापर्यंत काम केले आहे. दिल्लीत सुरु असलेली मोठी प्रॅक्टिस सोडून मी इथे आलो,” असे शिवाजीराव जाधव म्हणाले.