माजी खासदार ए.टी.नानांसारखा हुकमी एक्का, पारोळ्याचा कार्यक्रम करणार का पक्का ?
मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर उंचावल्या भुवया
Loksabha Election | लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपचे माजी खासदार ए.टी.नाना पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काहींनी तर ए.टी.नाना पुन्हा खासदारकीवर दावा करण्यासाठी आल्याची बातमी सुद्धा पसरवून दिली. प्रत्यक्षात माजी खासदार पाटलांसारखे अन्य बरेच पदाधिकारी पारोळ्याहून आपल्याला भेटण्यासाठी येऊन गेल्याचा खुलासा मंत्री महाजन यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना केला. त्यांच्या बोलण्यातील रोख मात्र कोणाच्याही लक्षात आला नाही.
लोकसभेच्या सन 2019 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीवेळी भाजपने तत्कालिन खासदार ए.टी.नाना पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. अर्थातच, खासदार पाटील समर्थकांमध्ये त्यावेळी तीव्र नाराजी पसरली होती. ढवळून निघालेल्या जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा पारोळा तालुका बनला होता. प्रत्यक्षात स्मिता वाघ यांच्याबद्दल फार काही आकस न ठेवता नंतर स्वतः ए.टी.नाना पाटील यांनी रूसवा फुगवा बाजुला ठेवून पक्ष विरोधी कोणतीच भूमिका घेतली नव्हती. पक्षाच्या निर्णयाचे स्वागत करून पक्षाने दिलेल्या उमेदवाराला शक्य तेवढे सहकार्य करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, काही दिवसातच पुढे जाऊन अशा काही वेगवान घडामोडी घडल्या की स्मिता वाघांचे तिकीट कापून ते चाळीसगावच्या उन्मेश पाटलांना देण्यात आले. यथावकाश निवडणुका पार पडल्या, सगळा धुरळा खाली बसला. त्यानंतर ए.टी.नानांचे नाव देखील मागे पडले. तेव्हापासून काहीसे एकाकी पडलेले ए.टी.नाना जळगावमध्ये भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्याशी भेट झाल्यानंतर आता पुन्हा चर्चेत आले आहेत.
ए.टी.नाना पाटील यांच्या एंट्रीने अनेकांना भरली आहे धडकी
पारोळा तालुक्याच्या स्थानिक राजकारणात सध्या ए.टी.नानांचा फार सहभाग नसला तरी त्यांच्या शब्दाला तिथे आजही चांगली किंमत आहे. विविध पदे भूषवित असतांना त्यांनी यापूर्वी जोडून ठेवलेले अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते अजुनही त्यांच्या संपर्कात आहेत. हीच बाब हेरून लोकसभेच्या निवडणुकीत ए.टी.नानांसारखा हुकमी एक्का वापरून पारोळा तालुक्याचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या दृष्टीने भाजपनेही त्यामुळे पाऊले उचलली आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः ए.टी.नानांसारखा हुकमी एक्का वापरून पारोळा तालुक्यावर उड्या मारणाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्याच्या दृष्टीने डाव टाकला आहे. अर्थातच माजी खासदार पाटलांच्या प्रयत्नांनी योग्यवेळी पारोळा तालुक्याची मोठी रसद मिळाल्याने भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांना पाच लाखांचे मताधिक्य मिळून देणे भाजपसाठी आणखी जास्त सोपे जाणार आहे. दरम्यान, बऱ्याच दिवसांपासून सक्रीय राजकारणापासून लांब राहिलेल्या ए.टी.नानांच्या एंट्रीने अनेकांना चांगलीच धडकी भरल्याचे बोलले जात आहे.