शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रावेरचा उमेदवार घोषित करण्यासाठी का लागतोय एवढा वेळ ?
Loksabha Election | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत सात उमेदवारांची नावे घोषित झाली आहेत. दरम्यान, एकनाथ खडसेंच्या सूनबाई रक्षा खडसे यांच्या उमेदवारीमुळे लक्षवेधी बनलेल्या रावेर मतदारसंघाच्या बाबतीत राष्ट्रवादीकडून बऱ्याच दिवसांपासूव सावध भूमिका घेतली जात आहे. दरम्यान रावेरचा उमेदवार घोषित करण्यासाठी एवढा वेळ का लागतोय ? असा प्रश्न त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह मतदारांनाही पडला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून यापूर्वी वर्ध्यातून अमर काळे, दिंडोरीतून भास्करराव भगरे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे आणि अहमदनगरमधून नीलेश लंके यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर आता दुसऱ्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने बीडमधून बजरंग सोनवणे आणि भिवंडीमधून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, बीडमध्ये ज्योती मेटे यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता गृहीत धरली जात होती. प्रत्यक्षात त्याठिकाणी बजरंग सोनवणे यांना उमेदवारी मिळाली आहे. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रीतम मुंडे यांनी सोनवणेंचा पराभव केला होता. यावेळी पंकजा मुंडे यांच्याशी बजरंग मुंडे यांची थेट लढत होणार आहे.
जो कोणी उमेदवार स्वतः पैसा खर्च करू शकेल, त्यालाच उमेदवारी ?
जळगाव जिल्ह्यातील रावेरची जागा सहजासहजी जिंकण्याची शक्यता कमी झाल्याने त्याठिकाणी उमेदवार देण्याच्या बाबतीत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आता फार गंभीर राहिलेली नाही. जो कोणी उमेदवार स्वतः पैसा खर्च करू शकेल, त्यालाच उमेदवारी देण्याकडेही राष्ट्रवादीचा रावेरमध्ये कल राहिलेला आहे. त्यादृष्टीने आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवाराचा शोध पक्षाकडून अजुनही सुरूच आहे. त्यात म्हणावे तसे यश अद्याप न मिळाल्याने रावेरच्या जागेसाठी उमेदवार निश्चिती करताना शरद पवारांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. या सर्व घडोमोडीत रावेरच्या जागेसाठी शुक्रवारी (ता.05) उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.