शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होणार ?
-जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाचा असेल समावेश
Loksabha Election | लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख जवळ येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे संभाव्य उमेदवारांची दुसरी यादी आज गुरुवारी (ता.04) जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीत जळगाव जिल्ह्यातील रावेर तसेच बीड, सातारा, माढा आणि भिवंडी या मतदारसंघांचा समावेश असणार आहे. त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बऱ्याच दिग्गजांनी उमेदवारी करण्यास नकार दिला असून, पक्षाला अनेक ठिकाणी आजतागायत उमेदवार निश्चित करता आलेले नाही. विशेषतः सातारा मतदारसंघात शरद पवारांचे मित्र श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नाही सांगितल्याने त्याठिकाणी राष्ट्रवादीला अद्याप उमेदवार देता आलेला नाही. साताऱ्यासाठी भाजपाकडून उदयनराजेंचे नाव फायनल झाल्याचे मानले जात आहे. त्यांच्या विरोधात राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा देखील होती. मात्र, पृथ्वीराज बाबांनी पंजा चिन्हाशिवाय अन्य दुसऱ्या कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार नसल्याचे ठणकावून सांगितले. त्यामुळे सातारा मतदारसंघ कदाचित काँग्रेसला सोडावा लागण्याची वेळ शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर येऊ शकते, असेही बोलले जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातही सूनबाई रक्षा खडसेंच्या विरोधात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उमेदवारी करण्यास नकार दिल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. रक्षा खडसेंना टक्कर देऊ शकेल, असा तुल्यबळ उमेदवार देताना राष्ट्रवादीची कसोटी त्याठिकाणी लागली आहे. भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी तसेच ॲड.रवींद्र पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत. पैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, ते गुरुवारी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.