“भाजप मित्रपक्षांचा वापर करतो आणि नंतर फेकून देतो”
Loksabha Election : महायुतीचा लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा तिढा अजुनही सुटलेला नाही. दरम्यान, भाजप हा मित्रपक्षांचा वापर करतो आणि नंतर फेकून देतो, असा मोठा गैरसमज निवडणुकीच्या तोंडावर पसरणे नुकसानीचे ठरण्याची शक्यता असल्याने शिंदेसेना आणि अजित पवार गटाला मनाजोगत्या जागा देण्याचा नवा प्रस्ताव भाजपने मित्रपक्षांसमोर ठेवल्याचे वृत्त आहे.
लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाबाबत झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार, महाराष्ट्रात भाजप 32, शिंदेसेना 12 आणि अजित पवार गट 04 असा जागांचा फॉर्म्युला ठरल्याचे सूत्रांकडून समजते. मित्रपक्षांच्या दबावानंतर अगदी शेवटच्या क्षणी बदल झाला तरी राष्ट्रवादीला एक जागा वाढवून देत भाजप 31, शिंदेसेना 12 आणि अजित पवार गट 05 अशा प्रकारे जागा वाटपावर शिक्कोमोर्तब होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपचे जागा वाटपाचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून, फक्त 20 मुद्दे निकाली निघण्याचे बाकी असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले आहे.
‘अब की बार 400 पार’चे उद्दीष्ट गाठण्यासाठी महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी जास्तीतजास्त 32 जागा कोणत्याही परिस्थितीत लढवेल. मात्र, मित्रपक्षांमध्ये आपला फक्त वापर केला जातो आणि नंतर फेकून दिले जाते, असा गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून भाजप थोडीफार तडजोड करू शकते. तरीही 30 जागांच्या खाली भाजप येणार नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने महाराष्ट्रातील लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर करण्यातही भाजपाला मर्यादा आल्या आहेत. भाजपकडून नेमक्या कोणत्या उमेदवारांना तिकीट मिळते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.