जळगावमधील नाराजी नाट्याला जुनी परंपरा….भाजपच्या रणनितीपुढे निष्प्रभ ठरेल का नाराजांची फळी ?
Loksabha Election | भारतीय जनता पार्टीने जळगावमध्ये विद्यमान खासदाराला उमेदवारी नाकारून गेल्या निवडणुकीत तिकीट कापलेल्या स्मिता वाघ यांना उमेदवारी देऊन मोठे धक्कातंत्र यावेळी अवलंबले आहे. अशा या स्थितीत स्मिता वाघ यांना त्यांचा सन्मान परत मिळाल्याचे समाधान पक्षातील त्यांच्या समर्थकांमधून व्यक्त होत असताना, दुसरीकडे खासदार समर्थकांमधून मात्र नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. दरम्यान, जळगाव मतदारसंघातील नाराजी नाट्याला जुनी परंपरा असताना भाजपच्या रणनितीपुढे नाराजांची फळी निष्प्रभ ठरते की वरचढ, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आधीचा एरंडोल आणि आताचा जळगाव लोकसभा मतदारसंघ हा सुमारे 35 वर्षांपासून भाजपाचा एकहाती बालेकिल्ला राहिला आहे. आतापर्यंतच्या वाटचालीत अपवाद मधला एक वर्षांचा काळ सोडला तर लोकसभेच्या या मतदारसंघात प्रत्येकवेळी भाजपाचा खासदार मोठ्या मताधिक्याने विजयी झालेला आहे. अर्थात, जेव्हा केव्हा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले भाजपाने कोणतीच जोखीम नको म्हणून या मतदारसंघात नेहमीच ताक फुंकुन प्यायले आहे. पक्षांतर्गत किंवा बाह्य नाराजी लक्षात घेता लोकसभा उमेदवार देण्याच्या बाबतीत देखील कधीच तडजोडीचे धोरण स्वीकारलेले नाही. त्याचा प्रत्यय विशेषतः सन 2019 चा निवडणुकीत हमखास आला होता. तत्कालिन खासदार ए.टी.पाटील यांनाच पुन्हा भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याचे गृहीत धरले जात असताना, पक्षाने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा स्मिता वाघ यांना उमेदवारी देऊन मोठा धक्का दिला होता. दरम्यान, एबी फार्म मिळाल्यावर श्रीमती वाघ यांनी प्रचाराला सुरूवातही केली होती, तेवढ्यात त्यांना अचानक थांबण्याच्या सूचना पक्ष श्रेष्ठींकडून देण्यात आल्या होत्या. उन्मेश पाटील हे त्यानंतर भाजपाच्या तिकीटावर उभे राहून मोठ्या मताधिक्याने विजयी देखील झाले होते.
भाजपासाठी जळगाव मतदारसंघातील नाराजी नाट्य नवीन नाही
2019 मध्ये स्मिता वाघ यांना जळगावसाठी भाजपाकडून तिकीट मिळाल्यावर तत्कालिन खासदार ए.टी.पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. किंबहुना स्मिता वाघ यांच्या विरोधात काम करण्याच्या दृष्टीने हालचाली गतीमान सुद्धा करण्यात आल्या होत्या. तरीही भाजप पक्षश्रेष्ठी पक्षांतर्गत विरोधाला न जुमानता दिलेला उमेदवार न बदलण्याच्या निर्णयावर ठाम राहिले होते. दुर्दैवाने नंतरच्या काही दिवसात असे काही चक्र वेगाने फिरले की स्मिता वाघ यांना पक्षाकडून थांबविण्यात आले आणि उन्मेश पाटील यांच्याकडे लोकसभा उमेदवारी सोपविण्यात आली. अर्थातच, प्रचाराला सुरूवात झाल्यानंतर उमेदवारी हातातून गेल्यानंतर त्यावेळी स्मिता वाघ समर्थकांनीही मोठी आदळ आपट केली होती. अनेकांनी तर भाजपच्या विरोधात जाऊन निवडणुकीत असहकार्याची भूमिका घेतली होती. प्रत्यक्षात त्यावेळी खुद्द स्मिता वाघ यांनी समंजस्याने वागून आपल्या समर्थकांना तसे कोणतेच पाऊल न उचलण्याचा सल्ला देऊन समजविले होते. त्या स्वतः पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मतदारसंघात फिरल्या होत्या.
भारतीय जनता पार्टीची रणनिती थोपविणार का यावेळचे बंड ?
यंदाच्या म्हणजेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत स्मिता वाघ यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर गेल्या वेळच्या नाराजीची पुनरावृत्ती यावेळीही होण्याची अपेक्षा भाजप पक्षश्रेष्ठींना होती. अपेक्षेनुसार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रत्यय देखील येत आहे. उमेदवारी न मिळाल्याने विद्यमान खासदार आणि त्यांचे समर्थक तीव्र नाराज असल्याची चर्चा देखील ऐकण्यास मिळत आहे. नाराज असलेले खासदार त्यांच्या पत्नीला शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आधी बोलले जात होते. नंतर त्यांनी पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष असलेल्या त्यांच्या मित्राचे नाव उमेदवारीसाठी पुढे केल्याचेही ऐकण्यात आले. परंतु, खासदारांनी त्यास कधीच दुजोरा दिलेला नाही. दुसरीकडे भाजपचे नेतेही पक्षाने दिलेल्या उमेदवाराचेच काम खासदार करतील, असे ठणकावून सांगताना दिसून आले आहेत. तरीही एकूण वातावरण लक्षात घेता भाजप पक्षश्रेष्ठी पक्षांतर्गत बंड कसे थोपवितात, त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्ज भरण्याच्या वेळेपर्यंत खरे काय ते चित्र स्पष्ट होणारच आहे.