सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजेंच्या विरोधात उभे राहणार माजी मुख्यमंत्री ?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची नवी खेळी
Loksabha Election | सातारा लोकसभा मतदारसंघात श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारी न करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा मोठा नाईलाज झाला आहे. उदयनराजेंना टक्कर देऊ शकेल, असा तुल्यबळ उमेदवार शोधताना खुद्द शरद पवारांच्या नाकीनऊ आले आहेत. अशा या परिस्थितीत साताऱ्याची जागा काहीही करून महाविकास आघाडीकडे राहावी म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उदयनराजेंच्या विरोधात थेट माजी मुख्यमंत्र्यांनाच मैदानात उतरविण्याच्या दृष्टीने डावपेच खेळण्यास सुरूवात केल्याचे वृत्त आहे.
उदयनराजे भोसले यांना तगडे आव्हान देण्याच्या दृष्टीने साताऱ्यातून उमेदवार उभा करताना राष्ट्रवादीचा उमेदवार देण्याऐवजी मतदारसंघाचे महत्त्व लक्षात घेत थेट माजी मुख्यमंत्र्यांना उमेदवारी देण्यासंदर्भात चाचपणी सुरु आहे. साताऱ्यातून ज्या नेत्याला निवडणूक लढण्याची गळ शरद पवार गटाकडून घतली जाण्याची शक्यता आहे त्या नेत्याचं नाव आहे पृथ्वीराज चव्हाण. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी याचसंदर्भात चर्चा करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्यनराजेंच्या उमेदवारीला महाविकास आघाडीकडून तगडे आव्हान देण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा पर्याय भाजपासाठी अडचणीचा ठरणार असल्याचे मत राजकीय जाणकारांनी सुद्धा व्यक्त केले आहे.
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाणांसारख्या उच्च शिक्षित आणि प्रशासनाची जाण असलेल्या व्यक्तीला उमेदवारीची मागणी केली होती. तशात रविवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात बंद दाराआड तासभर चर्चा झाल्याने पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी मिळण्याच्या शक्यतेला अधिक बळ मिळाले आहे. चव्हाण हे शरद पवार गटाची ही ऑफर स्वीकारतील की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.