अजितदादांच्या डोक्याला ताप देणारे विजय शिव’तारे’ अखेर जमिनीवर
Loksabha Election : पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत लोकसभेची उमेदवारी करण्याची घोषणा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील माजी आमदार विजय शिवतारे यांनी विशेषतः अजितदादांच्या डोक्याला मोठा ताप दिला होता. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी करण्याची सूचना केल्यानुसार मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर शिवतारे यांनी त्यांचे बंड थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्ववादी काँग्रेसनेही सुटकेचा निश्वास सोडला आहे.
महायुतीतील वाढता तणाव पाहता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेवरून बारामती वाद सोडविण्याची जबाबदारी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शिवतारे यांना समोर बसवून प्रकरण मिटवण्याचा निर्णय घेतला. शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर आरोप करत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात बारामती मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्याचा इशारा दिला होता. अजित पवार अहंकारी आहेत, असाही आरोप त्यांनी केला होता.
याशिवाय गुंजवणी धरणातून पाणी पुरवठ्यासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मुद्दाम न दिल्याचा आरोप शिवतारे यांनी अजित यांच्यावर केला होता. शिवतारे हे अजित पवारांचे विरोधक मानले जातात. शिवतारे 2009 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर पुरंदर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले होते. तिन्ही नेत्यांनी शिवतारे यांना त्यांच्या मतदारसंघातील सुमारे 11 विकास प्रकल्पांना निधी देऊन गती देण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर या नेत्यांची बैठक सुमारे दीड तास चालली.