भाजपकडून जळगाव, रावेरचे लोकसभा उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच सोशल मीडियावर पतंगबाजी
Loksabha Election : भाजपने लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी अनेक दिग्गजांचा समावेश असलेली 195 नावांची पहिली यादी 02 मार्चला जाहीर केली होती. त्यानंतर दुसरी यादी जाहीर करण्याच्या दृष्टीने पक्षाकडून आता हालचालींना वेग देण्यात आला असून, त्यात महाराष्ट्रातील उमेदवारांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे. दरम्यान, जळगावसह रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर होण्यापूर्वीच सोशल मीडियावर सध्या राजकीय पतंगबाजीला चांगलेच उधाण आले आहे.
भाजपचे निरीक्षक आमदार प्रवीण दरेकर यांनी 29 फेब्रुवारीला आढावा घेतल्यानंतर खासकरून जळगावमध्ये लोकसभेचा उमेदवार बदलण्याच्या बाहेर सुरू असलेल्या चर्चेबाबात प्रसार माध्यमांसमोर मोठा खुलासा केला होता. भाजपात कोणाला वाटले म्हणून उमेदवारी आणि कोणाला नाही वाटले म्हणून उमेदवारी, अशी पद्धत नसते. त्या उमेदवाराचे योग्य ते मूल्यमापन केले जाते तसेच संघटनेचे मत विचारात घेतले जाते. विकासाच्या संदर्भात भूमिका बघितली जाते. आमच्याकडे खूप बारकाईने पाहणारी यंत्रणा आहे. त्या चौकटीत व निकषात बसून उमेदवारी दिली जाते. बाहेर ज्या चर्चा असतात त्या खऱ्या किती खोट्या किती याचा अभ्यास करून निर्णय होत असतो. तो लोकसभा उमेदवार निवडीच्या वेळी बरोबर होईल”, असेही आमदार श्री. दरेकर यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार भाजपकडून लोकसभा उमेदवारांच्या निवडीसाठी पक्ष पातळीवर आवश्यक ती प्रक्रिया सध्या सुरू आहे.
तरीही सोशल मीडियावर उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची स्पर्धा
भाजपकडून लोकसभेच्या जळगाव तसेच रावेर मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांच्या नावांची अद्याप घोषणा झालेली नाही. दोन्ही उमेदवारांची नावे गुलदस्त्यातच आहेत. पक्षाचा तो खासगी विषय असल्याने उमेदवार निवड प्रक्रियेत बाहेरील दुसऱ्या कोणाला त्यात हस्तक्षेप करण्याचा तसा अधिकार देखील नाही. त्यानंतरही भाजपने लोकसभेच्या निवडणुकीत यावेळी कोणाला उमेदवारी द्यावी, असा प्रश्न उपस्थित करून सोशल मीडियावर मोठी मोहीम सध्या हाती घेण्यात आली आहे. त्या मोहिमेचा आधार घेऊन भाजप त्यांच्या दोन्ही उमेदवारांची निवड करणार असल्याचेही मतदारांना भासविले जात आहे. या सर्व प्रकाराची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू असून, त्यातून अनेकांची करमणूक होताना दिसत आहे.