राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून बुधवारी रावेरच्या जागेसाठी उमेदवाराचे नाव निश्चित होणार
Loksabha Election : राज्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची महत्वपूर्ण बैठक मुंबईत बॅलार्ड इस्टेट येथे बुधवारी (ता.27) आयोजित केली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील रावेरसह राज्याच्या इतर 10 मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या त्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्रासह इतर राज्यातील पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे जे संभाव्य लोकसभा उमेदवार आहेत, त्यांची माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर अंतिम चर्चा होऊन उमेदवारांच्या नावाचे ठराव सर्वानुमते पास केले जाणार आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी गुरुवारी जाहीर होणार
संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर गुरुवारी (ता.28) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर होणार आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष राज्यात 10 जागांवर निवडणूक लढणार आहे. त्यात लोकसभेच्या बारामती, माढा, शिरुर, सातारा, बीड, वर्धा, रावेर, अहमदनगर, भिवंडी आदी मतदारसंघांचा समावेश असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.