काँग्रेसने पाय घातला, शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झालीच नाही
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून मंगळवारी (ता.26) राज्यातील उमेदवारांची नावे सामना दैनिकातून जाहीर करण्यात येणार होती. मात्र, सोमवारी सायंकाळी उशिरा मातोश्रीवर झालेल्या मित्रपक्षांच्या बैठकीत काँग्रेस पाय घातल्याने मोठा वाद झाला. त्यामुळे सेनेला तयार असलेली यादी जाहीर करताच आली नाही. वादावर तोडगा काढण्यासाठी आता दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
शरद पवारांच्या उपस्थितीत मातोश्रीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शिवसेना ठाकरे गटासह काँग्रेसने सांगली तसेच भिवंडी व दक्षिण मध्य मुंबईतील जागांवर दावा केला. सांगली मतदारसंघ पूर्वापार काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सांगली सेनेला देण्यास काँग्रेसने नकार दिला. दुसरीकडे भिवंडी मतदारसंघावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा डोळा आहे. अशा या परिस्थितीत काँग्रेस त्यांच्या भूमिकेवर ठाम असताना, शिवसेना ठाकरे गटाचा नाईलाज झाला. शरद पवारांच्या उपस्थितीतही महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. प्राप्त माहितीनुसार सेनेला सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी द्यायची आहे. तर काँग्रेसला सांगलीमधून राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवार म्हणून लोकसभेसाठी उभे करायचे आहे.