भाजपा महाराष्ट्रात 32 ते 34 जागांवर लोकसभेसाठी उमेदवार देण्याची शक्यता

शिवसेना-राष्ट्रवादीच्या मतदारसंघातही शक्य झाल्यास निवडणूक लढणार

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करीत उमेदवारांची चाचपणी देखील सुरु केली आहे. मात्र, जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने विशेषतः महाराष्ट्र राज्यात कोणता पक्ष किती जागा लढविणार त्याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, महाराष्ट्रात 45 चा जादुई आकडा पार करण्यासाठी विशेषतः भारतीय जनता पार्टी यावेळी 32 ते 34 जागांवर उमेदवार देण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 मतदारसंघांपैकी तब्बल 45 जागांवर भाजप व मित्रपक्ष शिवसेना-राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणण्याचा ध्यास केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे. त्याच उद्देशाने भाजप नेते अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरूवात महाराष्ट्रापासून केली सुद्धा आहे. दरम्यान, भाजपचा मित्रपक्ष शिंदेसेनेने लोकसभेच्या 22 जागांवर तसेच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने 10 जागांवर हक्क सांगितला आहे. परंतु, भाजप दोन्ही मित्रपक्षांना लोकसभेच्या तेवढ्या जागा सोडण्याच्या मनःस्थितीत दिसत नाही. कारण, एका सर्व्हेनुसार शिंदेसेना किंवा अजित पवार गटासाठी ते जेवढ्या जागांवर हक्क सांगत आहेत, तेवढ्या जागा जिंकणे यावेळी अवघड जाणार आहे. त्यामुळे दोन्ही मित्रपक्षांना समजावून सांगून त्यांच्या काही जागांवर भाजप वाटाघाटीनंतर त्यांचे उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे.

लोकसभेच्या बदल्यात विधानसभेच्या जागा सोडणार
जागा वाटपाचा तिढा सोडविण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्री अमित शहा तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात मंगळवारी (ता. 05) मुंबईत रात्री उशिरा बैठक झाली. त्यात झालेल्या चर्चेनुसार लोकसभेच्या काही जागा लढविण्यावर ठाम असलेल्या दोन्ही मित्रपक्षांना समजावून सांगा, हवे तर त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत जास्तीच्या जागा देऊन झुकते माप देऊ. तसा त्यांना विश्वास द्या, अशा सूचना केंद्रीय मंत्री श्री. शहा यांनी फडणवीस आणि बावनकुळे यांना दिल्याचे समजते.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button