भाजपात राहून भाजपच्या नेत्यांवर टीका करणाऱ्यांचा पाचव्या यादीत पत्ता कट

Loksabha Election : भाजपाकडून लोकसभा निवडणुकीतील संभाव्य उमेदवारांची पाचवी यादी जाहीर असली, तरी हवेत उडणाऱ्यांना त्यांची जागा पक्षाने यावेळी दाखवून दिली आहे. भाजपात राहून भाजपच्याच नेत्यांवर उठसूठ टीका करणाऱ्या काही जणांचा पत्ता लोकसभा निवडणुकीत कट करण्यात आला आहे. नवीन चेहऱ्यांना संधी देऊन भाजपने अवलंबलेल्या धक्का तंत्रामुळे अनेकांची मोठी पंचाईत होऊन बसली आहे.

भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून, त्यात तीन जागांचा समावेश आहे. सोलापुरात राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या जागेवर सध्या भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी खासदार आहेत. जयसिद्धेश्वर स्वामींचे यावेळी तिकीट कापले गेले आहे. भंडारा-गोंदियातून सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर गडचिरोली-चिमूर मतदारसंघासाठी अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशोक नेते यांना भाजपकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे.

खासदार वरुण गांधी यांचेही तिकीट कापले
उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये विद्यमान खासदार वरुण गांधी यांचे तिकीट कापून त्यांच्या जागी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील मंत्री जितिन प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वरुण गांधी यांचे तिकीट रद्द झाले असले तरी भाजपने त्यांच्या आई मनेका गांधी यांना सुलतानपूरमधून पुन्हा उमेदवारी दिली आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना ओडिशातील संबलपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. अभिनेत्री कंगना राणौतला हिमाचल प्रदेशातील मंडी येथून तिकीट देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले माजी खासदार नवीन जिंदाल यांना भाजपने कुरुक्षेत्रमधून उमेदवारी दिली आहे. तर झारखंडमधील दुमका येथून भाजपने सीता सोरेन यांना उमेदवारी दिली आहे. सीता सोरेन या झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या वहिनी असून त्यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला होता.

अनेक केंद्रीय मंत्र्यांना पुन्हा उमेदवारी बहाल
माजी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह पूर्व चंपारणमधून तर संजय जयस्वाल पुन्हा एकदा पश्चिम चंपारणमधून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने केरळचे माजी अध्यक्ष के सुरेंद्रन यांना वायनाड मतदारसंघातून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह पुन्हा एकदा बेगुसरायमधून निवडणूक लढवणार आहेत, तर अन्य केंद्रीय मंत्री बिहारमधून नित्यानंद राय, उजियारपूरमधून आरके सिंह, पाटलीपुत्रमधून रामकृपाल यादव निवडणूक लढवणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना पुन्हा एकदा पटना साहिबमधून तर सुशील कुमार सिंग यांना औरंगाबादमधून तिकीट देण्यात आले आहे. नवाडामधून राज्यसभा सदस्य विवेक ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button