रक्षा खडसेंनी सासुच्या विरोधात केला होता प्रचार, आता आम्ही आमचे काम करू- रोहिणी खडसे

Loksabha Election : लोकसभेच्या रावेर मतदारसंघात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधात त्यांच्या नणंद रोहिणी खडसे-खेवलकर यांनी उमेदवारी करण्यास नकार दिलेला असला तरी, आपण निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचेच काम करू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यासोबतच भावजय रक्षा खडसे यांनी सासू मंदाकिनी खडसे यांच्याही विरोधात दूध संघाच्या निवडणुकीत प्रचार केला होता. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत आता आम्ही आमचे काम करू, असाही खुलासा रोहिणी खडसे यांनी केला आहे.

लोकसभेच्या भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधात त्यांच्याच परिवारातील दुसऱ्या एखाद्या उमेदवाराला तिकीट देऊन रावेरची जागा सहजपणे खिशात घालण्याचा मनसुबा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा होता. त्यासाठी बारामतीचा नणंद-भावजय पॅटर्न राबविण्याची व्यूहरचना देखील आखण्यात आली होती. परंतु, एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे त्या पॅटर्नला अजिबात बळी पडल्या नाहीत. दोन दिवसांच्या राजकारणासाठी परिवारात कायमची भांडणे निर्माण होणार नाहीत, याची काळजी बाप व लेकीने घेतली. रावेरमध्ये बारामतीचा पॅटर्न न चालल्याने शरद पवार गटाचा त्यामुळे शेवटी नाईलाज झाला. अशा या परिस्थितीत रक्षा खडसे यांना प्रत्यक्ष किंवा समोर येऊन मदत न करता पडद्यामागून साथ देण्याची भूमिका एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे घेतात की काय, असा प्रश्न जनसामान्यांमधून उपस्थित केला जात होता. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांना प्रसिद्धी माध्यमांनी थेट विचारणाच केली. तेव्हा रोहिणी खडसे यांनी त्यांच्या भावजय रक्षा खडसे आणि त्यांच्या पक्षाबद्दल काही धक्कादायक विधाने केली.

आधीच्या सगळ्या निवडणुकांमध्ये जे झाले होते, तेच आताही होणार
रोहिणी खडसे म्हणाल्या, की “मी प्रदेशाध्यक्ष या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी बांधील आहे आणि पक्षाच्या विचारधारेशी जुळळेली आहे. तुम्ही याआधी पार पडलेल्या निवडणुकांमध्ये बघितले असेल, मुक्ताईनगर मतदारसंघात रक्षा खडसे यांनी त्यांच्या भारतीय जनता पक्षाचे काम केले आहे आणि आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार केला आहे. माझ्या आई मंदाकिनी खडसे जेव्हा जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीत उमेदवार होत्या, त्यावेळी रक्षा खडसे यांनी सासुंच्या विरोधात प्रचार केला होता. ज्यावेळी दूध संघ तसेच बाजार समित्या व नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या होत्या, त्यावेळी आम्ही आमच्या पक्षाचे काम केले आहे. त्यामुळे आधी झाले होते, तेच आताही होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जो कोणी लोकसभेसाठी उमेदवार दिला जाईल, त्याच्या विजयासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. आम्ही आमच्या पक्षाच्या विचारधारेशी आम्ही बांधील राहू.”

WhatsApp Group

Related Articles

Back to top button