जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवार करण पवारांची अनामत रक्कम अखेर झाली जप्त !
जळगाव टुडे | लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकूण वैध मतांच्या 1/6 पेक्षा कमी मते पडलेल्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात सुमारे 12 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले होते. त्यानुसार जप्त झालेली सुमारे तीन लाख रूपयांची सदरची रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आली आहे. (Loksabha Election)
लोकसभेच्या जळगाव मतदारसंघात एकूण 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. प्रत्यक्षात दोनच उमेदवारांची अनामत रक्कम वाचली असून, उर्वरित 12 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. प्राप्त माहितीनुसार जळगाव मतदारसंघात एकूण सुमारे 11 लाख 55 हजार 364 मते वैध ठरली आहेत आणि त्याच्या 1/6 मतांची संख्या 1 लाख 92हजार 605 इतकी भरली आहे. त्यानुसार 12 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्जासोबत भरलेली सुमारे सुमारे 2 लाख 87 हजार 500 रुपये अनामत रक्कम जप्त शासनाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ तसेच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पाटील-पवार यांना एकूण मतांच्या 1/6 पेक्षा जास्त मिळाले आहेत. त्यामुळे दोघांना प्रत्येकी 25 हजार रूपयांची अनामत रक्कम सुद्धा परत करण्यात येणार आहे.
नामसाधर्म्यामुळे चर्चेचा विषय ठरले होते अपक्ष उमेदवार करण पवार
लोकसभेच्या निवडणुकीत सारख्या नावाचे उमेदवार देण्याची खेळी बऱ्याचवेळा राजकीय पक्षांकडून खेळली जाते. त्यातून मतदारांना गोंधळात टाकण्याचा बऱ्याचवेळा प्रयत्न केला जातो. यंदाही जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने करण पाटील-पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर अपक्ष उमेदवार करण पवार यांचा अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे ते चर्चेचा विषय सुद्धा ठरले होते. प्रत्यक्षात अपक्ष उमेदवार करण पवार यांना निवडणुकीत फक्त 3983 मते मिळाली, ज्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.