गिरीश महाजन यांच्याकडून भाजप उमेदवारांना मिळाला 100 टक्के यशस्वी होण्याचा फॉर्म्युला…
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीने जळगाव जिल्ह्यात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. रावेर आणि जळगाव मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी कोणतीच कसर बाकी ठेवलेली नाही. दरम्यान, भाजप नेते गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही उमेदवारांना निवडणुकीत 100 टक्के यशस्वी होण्याचा व मतदारांच्या मनावर कायम अधिराज्य गाजविण्याचा एक खास फॉर्म्युला देखील सांगितला आहे.
भाजप नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव शहरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच नियोजन बैठक पार पडली. त्यात मार्गदर्शन करताना मंत्री श्री. महाजन म्हणाले, की “मला स्वतःला कोणताच बडेजाव पटत नाही. पक्षाच्या कार्यात वेळप्रसंगी कोणतेही काम करण्याची माझी तयारी असते, मला स्टेजवर स्थान नाही मिळाले तरी चालते. शेवटी तुम्ही लोकांच्या मनात बसले पाहिजे स्टेजवर नाही. भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही भावी खासदारांनी त्याची काळजी घ्यावी. कार्यकर्त्याच्या पायात काटा रूतल्यावर नेत्याच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे तसेच नेता अडचणीत असताना कार्यकर्ते धावून आले पाहिजे. आपले काम हीच आपली ओळख असली पाहिजे. कार्यकर्ते हीच आपली ताकद असली पाहिजे. मी स्वतः जामनेर मतदारसंघात फारच कमी वेळ असतो. विधानसभेच्या निवडणुकीत बऱ्याचवेळा तालुक्यात प्रचाराला देखील जात नाही. मात्र, जीवाला जीव देणारे माझे कार्यकर्ते सर्व सांभाळून घेतात. माझी कुठेच उणीव भासू देत नाही. निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावरच मी गेल्या सहा टर्म जामनेर मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी देखील होत आहे. विजयी घोडदौड कायम ठेवून आता सातव्यांदा मी विधानसभेचे प्रतिनिधीत्व करणार आहे. विधानसभेत माझ्याइतका सिनियर दुसरा कोणी लोकप्रतिनिधी सुद्धा आता नाही.”
म्हणूनच तर भारतीय जनता पार्टी हा देशात क्रमांक एकचा पक्ष आहे…
“लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना कधीही मी पणा नको. पक्षातही एक परिवार म्हणून काम केले पाहिजे. प्रत्येकाच्या सुख-दुःखात कामी पडले पाहिजे. अडचणीत असलेल्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. जिवाभावाचे नाते जोपासले पाहिजे. पक्षाचा पदाधिकारी हा एक कार्यकर्ता म्हणूनच वारला पाहिजे. रूसवे-फुगवे तसेच नाराजी क्षणिक असते. सर्व कार्यकर्ते अगदी एक दिलाने पक्षासाठी झोकून काम करतात, मान सन्मानाची कोणतीही अपेक्षा न बाळगता पक्षाचा झेंडा घेऊन फिरतात. म्हणूनच तर आज भारतीय जनता पार्टी देशात क्रमांक एकचा पक्ष बनला आहे,” असेही भाजप नेते गिरीश महाजन यांनी नमूद केले.