नाशिक जिल्ह्यात नरेंद्र मोदी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या आज बुधवारी जाहीर सभा
जळगाव टुडे । लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) प्रचारासाठी नाशिक जिल्ह्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिकचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महायुतीसह महाविकास आघाडीने आवश्यक ती जय्यत तयारी केली आहे. जाहीर सभांच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन दोन्ही गटांकडून होणार असल्याने मतदारांचेही त्याकडे लक्ष वेधले गेले आहे.
राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा धडका सुरु झाला आहे. राज्यात बुधवारी नाशिक आणि मुंबईत प्रचाराचा ज्वर शिगेला पोहचणार आहे. नाशिक जिल्ह्यात तर आज सभांचा दिवस असणार आहे. नाशिक जिल्ह्यातील तिन्ही सभांकडे मतदारांचे आज विशेष लक्ष लागले आहे. आजच्या सभेतून हे तीन दिग्गज नेते काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
महायुतीच्या नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पिंपळगावमध्ये होणार आहे. याशिवाय दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची जाहीर सभा वणीमध्ये सभा होणार आहे. तसेच नाशिक लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा नाशिक शहरात होणार आहे.