कारच्या अपघातात चौघांचा मृत्यू; रामदेववाडीच्या ग्रामस्थांचा दोषींच्या अटकेसाठी थेट मतदानावर बहिष्कार !

जळगाव टुडे । भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने आईसह तिच्या दोन मुलांचा व भाच्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (ता.07) रामदेववाडी (ता.जळगाव) येथे घडली होती. पोलिसांनी कार चालकावर सदोष मणुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला असला तरी चालकासह कारमधील अन्य दोघांना अद्याप अटक मात्र झालेली नाही. त्यामुळे दोषींना अटक होत नाही तोपर्यंत मतदान करणार नसल्याच्या निर्धार रामदेववाडीच्या ग्रामस्थांनी केला होता. प्रत्यक्षात आज सोमवारी एकाही ग्रामस्थाने तिथे मतदानाचा हक्क बजावला नाही. ( Loksabha Election)

राजेश अलसिंग चव्हाण यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, चौघांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या कारमध्ये जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांचा मुलगा अखिलेश तसेच मंत्री अनिल पाटील यांचे खासगी सचिव अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल हा देखील होता. परंतु, पोलिसांनी फक्त कार चालकावर सदोष मणुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. अन्य दोघांवर कोणताच गुन्हा दाखल केलेला नाही. संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांसह रामदेववाडीच्या ग्रामस्थांनी त्यामुळे मृतदेह ताब्यात घेण्यास त्यावेळी नकार सुद्धा दिला होता. परंतु, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः सर्वांची समजूत काढल्याने परिस्थिती नियंत्रणात आली होती. प्रत्यक्षात त्यानंतरही कारवाईसाठी कोणतीच हालचाल न झाल्याने रामदेववाडीच्या ग्रामस्थांनी पोलिस व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेवटी आज सोमवारी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.

आजही पालकमंत्र्यांनी मधस्थी करून पाहिली
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर रामदेववाडी येथील ग्रामस्थांनी बहिष्कार टाकल्याची माहिती समजताच पालकमंत्री गुलाबराव पाटील हे सोमवारी सकाळी तातडीने तिकडे रवाना झाले. तिथे गेल्यानंतर त्यांनी नाराज ग्रामस्थांची बैठक घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न देखील केला. पण काहीच उपयोग झाला नाही. ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या बाबतीत ठाम राहिले. त्यामुळे तेथील दिवसभर मतदान केंद्रावर कोणीच फिरकले नाही. सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button