लोकसभेच्या रावेर, जळगाव मतदारसंघात भाजपाची एकतर्फी विजयाकडे वाटचाल…!
महायुतीच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार शोधताना आघाडीच्या नाकात दम
Loksabha Election : लोकसभेची निवडणूक घोषित होण्यापूर्वीच रावेर आणि जळगाव मतदारसंघातील दोन्ही प्रबळ उमेदवारांची नावे जाहीर करून भाजपाने आधीच अर्धी लढाई जिंकलेली आहे. दुसरीकडे महायुतीच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार शोधताना प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या मात्र नाकात दम आला असून, भाजपची एकतर्फी विजयाकडे त्यामुळे वाटचाल सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
भाजपकडून लोकसभेचे उमेदवार जाहीर होताच महाविकास आघाडीकडून राज्यातील त्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता होती. प्रत्यक्षात भाजपाकडून राज्यातील पहिल्या 20 उमेदवारांची नावे जाहीर झाली तरी, महाविकास आघाडीला लोकसभेसाठी उमेदवारांच्या नावांवर अद्याप शिक्कामोर्तब करता आलेले नाही. वास्तविक भाजपच्या यादीतील उमेदवारांची नावे जाहीर होण्यापूर्वी महाविकास आघाडीने संभाव्य उमेदवारांची चाचपणी देखील करून ठेवली होती. काहींना घोड्यावर बसण्यासाठी सज्ज राहण्याचे सूचितही करण्यात आले होते. मात्र, भाजपाची राज्यातील पहिली यादी जाहीर झाली आणि महाविकास आघाडीचे सर्व फासे उलटे पडले. भाजपाकडून जाहीर झालेल्या उमेदवारांपुढे आपला टिकाव लागणार नाही, हे लक्षात घेऊन महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेल्या अनेकांनी नंतर रणांगणातून सोयीस्कर माघारी फिरणे पसंद केले. अशा या परिस्थितीत विशेषतः रावेर आणि जळगाव मतदारसंघात महाविकास आघाडीची मोठी पंचाईत आता झाली असून, दोन्ही जागांसाठी प्रबळ उमेदवारांचा शोध घेताना त्यांच्या नाकीनऊ आले आहेत.
खडसे पिता-पूत्री हाती न लागल्याने महाविकास आघाडीचा झाला तिळपापड
भाजपच्या रणनितीमुळे हतबल झालेल्या महाविकास आघाडीने रावेरमध्ये भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे तसेच त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारीसाठी साकडे घालून पाहिले. पण खडसे पिता व पूत्री हाती लागलेच नाही. त्यामुळे तिळपापड झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नंतर त्याबद्दल जाहीरपणे नाराजी सुद्धा व्यक्त केली. दरम्यान, महाविकास आघाडीकडून रावेरमध्ये रक्षा खडसेंना टक्कर देऊ शकेल, अशा उमेदवाराचा शोध सुरू असतानाच भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाल्याचा दावा केला आहे. त्यांच्या समर्थकांनी त्याबद्दल फटाके फोडून व मिठाई वाटून आनंदोत्सव देखील साजरा केला आहे. चौधरींच्या उमेदवारीने भुसावळ मतदारसंघाचे राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे वृत्त प्रसार माध्यमांनीही दिले आहे.
जळगाव लोकसभेच्या उमेदवारीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या नावाचाही विचार
दुसरीकडे जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून स्मिताताई वाघ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीची लोकसभेसाठी उमेदवार शोधताना खूपच दमछाक झाली आहे. चांगला बलाढ्य उमेदवार खूप शोधाशोध करूनही मिळत नसल्याने महाविकास आघाडीला माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या नावाचाही लोकसभा उमेदवारीसाठी आता विचार करावा लागत आहे. एकूण चित्र लक्षात घेता रावेर आणि जळगाव मतदारसंघात लोकसभेची निवडणूक त्यामुळे एकतर्फी होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.