Leopard attack : तळोदा तालुक्यातील घटना; बिबट्याने नातू व आजीचा पाडला फडशा..!
Leopard attack : नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात काजीपूर शिवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात नातू व आजीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. श्रावण शिवज्या तडवी आणि साखराबाई खेमा तडवी अशी मृतांची नावे आहेत. गेल्या आठवडाभरात काजीपूर शिवारात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून, परिसरातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये त्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे.
Leopard attack: incident in Taloda Taluka; Grandson and grandmother were destroyed by a leopard..
काजीपूर शिवारातील अतूल सुर्यवंशी यांच्या शेतात राखणदारी करण्याचे काम तडवी कुटुंबीय करत होते. दरम्यान, मंगळवारी दुपारी साखराबाई तडवी ह्या शेळ्या चारण्यासाठी रानात गेल्या होत्या. बराच उशीर झाला तरी साखराबाई झोपडीकडे परतल्या नाही. तेव्हा त्यांचा नातू आणि मुलगी हे दोघे साखराबाईंच्या शोधासाठी निघाले. मात्र, वाटेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने श्रावणवर हल्ला चढवला आणि त्यास उसाच्या शेतात ओढत नेले. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने व आजुबाजुच्या शेतातील ग्रामस्थांनी आरडाओरड केली. दुसरीकडे आजीचा शोध घेतल्यावर तिचाही मृतदेह दुसऱ्या शेतात आढळून आला.
आठवडाभरापूर्वीच आठ वर्षीय बालकाचा बिबट्याने घेतला होता बळी
बिबट्याने साखराबाई तडवी यांचे डोके व छातीचा अर्धा भाग खाऊन नष्ट केल्याचे पाहुन अनेकांच्या अंगाचा थरकाप उडाला. श्रावण तडवी या बालकाच्या मानेवर तसेच डोक्यावर देखील बिबट्याने खोल जखमा केल्याचे दिसून आले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचाही मृत्यू झाला. गेल्याच आठवड्यात तळोदा तालुक्यातील चिनोदा येथे एका आठ वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केला होता आणि त्यात त्याचाही मृत्यू झाला होता. आठवडाभरातच तीन जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर तळोदा तालुका हादरला आहे. वन विभागाने नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी अद्याप कोणतीच हालचाल केलेली नाही, अशी माहिती मिळाली आहे.