लाडकी बहीण योजना : ऑगस्ट महिन्यानंतरही करता येईल महिलांना अर्ज !
जळगाव टुडे । मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये राज्य सरकारने महत्त्वाचे बदल केले आहेत. २१ ते ६५ वर्षांपर्यंतच्या अडीच लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्या महिलांना या योजनेअंतर्गत १५०० रुपये मिळणार आहेत. योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत सुद्धा ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यानंतरही महिलांना अर्ज करता येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेमध्ये जाहीर केले आहे. ( Ladaki Bahin Yojana )
एक जुलैपासून लाडकी बहीण योजना लागू झाली असून, योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यास दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत ज्या महिला अर्ज करतील त्यांनी एक जुलै रोजी अर्ज केला होता, असे समजून दोन्ही महिन्याचे एकत्रित पैसे त्यांना मिळणार आहेत. तर काही कारणास्तव ऑगस्ट महिन्यानंतर ज्या महिला अर्ज करतील, त्यांना अर्ज केलेल्या दिनांकापासून पैसे मिळतील. अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली आहे.
अंगणवाडी सेविकांना मिळणार ५० रुपये
सेतू सुविधा केंद्र आणि अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी महिलांना मदत करावी. यासाठी त्यांना प्रति अर्ज ५० रुपये मानधन राज्य सरकार देणार असल्याची महत्त्वाची घोषणा देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या व्यतिरिक्त ज्या सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून महिलांची आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न केला जाईल त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, असा कडक इशारा देखील श्री.फडणवीस यांनी दिला आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचे काम ऑफलाइन आणि ऑनलाईन देखील करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.