लाडकी बहीण योजना : एका कुटुंबातील दोनच महिलांना मिळणार १५०० रूपये !
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
जळगाव टुडे । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत राज्य शासनाने सुधारणा केली असून, नवीन बदलानुसार योजनेचा लाभ घेण्यासाठी आता महिलांना ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे. लाभार्थी महिलेची वयोमर्यादाही वाढवली आहे. रहिवास प्रमाणपत्राची अट सुद्धा शिथील झाली आहे. मात्र, लाडकी बहीण योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त दोनच महिलांना आता देण्यात येणार आहे. त्यासंबंधीची महत्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बुधवारी विधानसभेत केली. ( Ladaki Bahin Yojana )
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एका कुटुंबातील दोनच महिलांना लाभ दिला जाणार आहे. त्यापैकी एक विवाहित असेल आणि दुसरी अविवाहित असेल तरी देखील योजनेचा लाभ दोघांना घेता येईल, असे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन करताना म्हटले आहे. आम्ही कुटुंब नियोजन करून चूक केली का? असा प्रश्न विरोधकांमधून उपस्थित केला जात होता. त्या प्रश्नाचे उत्तर देखील या माध्यमातून मिळाले असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपयांचे अर्थसहाय्य केले जाणार आहे. या योजनेचा जीआर जारी झाला असून, त्याचा राज्यातील साडेतीन कोटी महिलांना लाभ होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, दोन बायका किंवा दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या महिलांना विशेषतः मुस्लीम महिलांना या योजनेचा लाभ देऊ नये, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रकाश महाजन यांनीही म्हटले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ देखील उडाली होती.