लाडकी बहीण योजनेत मोठी सुधारणा….जाणून घ्या काय झाला आहे नवीन बदल ?

जळगाव टुडे । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर त्यात खूप त्रूटी असल्याची टीका राज्यभरातून झाली होती. त्याअनुषंगाने राज्य शासनाने त्यात मोठी सुधारणा केली असून, नवीन बदलानुसार योजनेचा लाभ घेण्यासाठी आता महिलांना ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे लाभार्थी महिलेची वयोमर्यादा आता २१ ते ६५ करण्यात आली आहे. रहिवास प्रमाणपत्राची अट देखील शिथील झाली आहे. ( Ladaki Bahin Yojana )

राज्य सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी महिलांची खूपच धावपळ होत असल्याचे चित्र सगळीकडे दिसून आले होते. अर्ज भरण्यासह रहिवास दाखल्यासाठी सेतू सुविधा केंद्रांनी लूट चालवल्याचेही निदर्शनास आले होते. त्याविषयी विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानसभेत लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल केल्याचे जाहीर करावे लागले.

● लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची मुदत यापूर्वी दि. ०१ जुलै ते १५ जुलै २०१४ पर्यंत ठेवण्यात आली होती. परंतु, या मर्यादेत सुधारणा करण्यात आली असून आता सदरची मुदत दोन महिने वाढविण्यात आली आहे. त्यानुसार ३१ ऑगस्ट २९२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. विशेष म्हणजे ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करणाऱ्या लाभार्थी महिलांना ०१ जुलै २०२४ पासुनच दरमाह १५०० रूपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे.

● लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेमध्ये याआधी आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसले तरी त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.

● लाडकी बहीण योजनेत सहभागी लाभार्थी किंवा कुटुंबाच्या नावे असलेली 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट आता २१ ते ६० वर्ष वयोगटाऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात आला आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.

● २.५ लाख रूपये वार्षिक उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात आली आहे. याशिवाय यापूर्वी फक्त विवाहित, विधवा, घटस्फोटीत व परित्यक्त्या महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार असल्याचे म्हटले होते. मात्र, आता कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला म्हणजे मुलीला सुध्दा लाडकी बहीण योजनेतून १५०० रूपये दरमहा लाभ देण्यात येणार आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button