Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंकडून चौकशीची मागणी !
Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा महिलांना लाभ देण्यासाठी चुकीचे फॉर्म भरले असतील तर ती सरकारची चूक आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः तशी चूक झाल्याची कबुली दिली आहे. लाडकी बहीण योजनेत घोटाळा झाल्याचे गृहमंत्रीच मान्य करत असतील तर याची ईडी तसेच सीबीआयकडून चौकशी करावी, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
Ladaki Bahin Yojana : Big Scam in Ladaki Bahin Yojana; Demand for inquiry from Supriya Sule!
काँग्रेस व राष्ट्रवादीने यापूर्वी लाभाच्या अनेक योजना राबविल्या पण कधी लाभार्थींना धमकावण्याची किंवा उपकाराची भाषा वापरली नाही. कोणाला कधी मतासाठी प्रलोभन सुद्धा दाखवले नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पोटातले आता ओठांवर येत आहे. आम्हाला पुन्हा सत्ता द्या, लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट करू, असे ते सांगत आहेत. सध्या महायुतीकडे लाडकी बहीण योजनेशिवाय दुसरे काहीच सांगण्यासारखे नाही. त्यामुळे महिलांना लाडकी बहीण योजनेतून दरमहा १५०० रूपये देऊन मते खरेदी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात असल्याचा आरोपही खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी बँकांमध्ये गर्दी
महायुतीचे हे सरकार स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आलेले आहे. सरकार स्थापनेसाठी त्यांनी आमचे घर तसेच पक्ष फोडण्याचा प्रकार यापूर्वीच केला आहे. भाजपसारख्या अदृश्य शक्तीने आमच्याकडून पक्ष चिन्ह देखील ओरबाडून घेतले आहे. आज देखील सुप्रीम कोर्टात त्याबद्दलची केस सुरू आहे. ईडी, सीबीआय यासारख्या संस्थांचा वापर करून पक्ष फोडण्याचे काम या महायुतीने केले आहे, अशीही टीका सुप्रिया सुळे यांनी केली. लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी बँकांमध्ये होत असलेल्या गर्दीमुळे सर्वत्र गोंधळ सुरू आहे. हे सरकार मिस मॅनेजमेंटचे सरकार आहे. या सरकारकडून मला काहीही अपेक्षा नाही,असे सुद्धा खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.