लाडकी बहीण योजनेतून ‘या’ महिलांना अजिबात मिळणार नाहीत १५०० रूपये !

जळगाव टुडे । राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित केली. या योजनेंतर्गत राज्यातील २१ ते ६० वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपयांचे अर्थसहाय्य केले जाणार आहे.सदर योजना एक जुलैपासून लागू होणार असून, त्यासाठीचा शासन निर्णय जारी झाला आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी कोणत्या महिला पात्र ठरतील आणि कोणत्या अपात्र ठरतील, त्याविषयीचे निकष समोर आले आहेत. ( ladaki Bahin Yojana )

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
त्यात विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांचा समावेश असेल. किमान वयाची 21 वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळेल. सदर योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थींचे बँक खाते असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांच्या आत असण्याची अट आहे.

योजनेसाठी अशा महिला ठरतील अपात्र ?
कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या महिला, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरतात, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत, सेवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे १५०० रुपयांपेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतला आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहेत, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्त पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, ज्यांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) आहेत, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून १५०० रूपयांचा लाभ अजिबात मिळणार नाही.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button