Ladaki Bahin Yaojana : लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचे नाव आहे की नाही ? घरी बसल्या चेक करा !
Ladaki Bahin Yaojana : माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत राज्यातील लाखो महिलांनी अर्ज केले आहेत आणि त्यासाठीची अर्ज प्रक्रिया अजुनही सुरूच आहे. आता सरकार लवकरच पात्र ठरलेल्या अर्जदार महिलांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी लवकरच अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. यादीत आपले नाव आहे की नाही, हे तपासण्यासाठी काही सोप्या स्टेप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील.
माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणून समोर आली आहे. सरकारने या योजनेअंतर्गत पहिला हफ्ता रक्षाबंधनाच्या दिवशी देण्याचे ठरवले होते. मात्र, आता रक्षाबंधनाच्या आधीच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात एकदम दोन महिन्याचे ३००० रूपये जमा केले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या पात्रता यादीत तुमचे नाव आहे की नाही, ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तपासू शकता. ज्या महिलांनी योजनेंतर्गत अर्ज केले आहेत, त्या योजनेशी संबंधित त्यांच्या अर्जांची स्थिती तपासू शकतात.
यादीत आपले नाव आहे किंवा नाही ते कसे तपासावे ?
महिलांनी सर्वात आधी त्यांच्या फोनवर प्ले स्टोअरवरून ‘नारी शक्ती दूत’ ॲप डाऊनलोड करावे. यानंतर पुढील नवीन पेजवर विचारलेली सर्व माहिती नीट भरुन मग अर्ज उघडावा लागेल. तिथे तुम्हाला मुख्यपृष्ठावर माझी लाडकी बहीण योजनेचा पर्याय दिसेल, तो पर्याय निवडायचा आहे. मग तेथे तुम्हाला लाभार्थी यादी पाहण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे नाव यादीमध्ये आहे की नाही ते तपासू शकता. जर लाभार्थी यादीत तुमचे नाव असेल तर लवकरच तुमच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातील. मात्र जर तुमचे नाव या यादीत नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.