जयंत पाटलांचे ते पत्र चर्चेत…’ही लढाई संपलेली नाही तर, आता खरी सुरुवात झालीय’
जळगाव टुडे । लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर उमेदवारांसह पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आता कुठे थोडे विसावले आहेत. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवारातील सर्वच सदस्यांना भावनिक आवाहन करणारे एक पत्र पाठवले आहे. ज्याची सध्या सगळीकडे चर्चा देखील आहे. ‘ही लढाई संपलेली नाही तर, आता खरी सुरुवात झालीय’, असे त्या पत्रात प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी म्हटलेले असून, त्यातून अनेक अर्थ काढले जात आहेत.
“लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंतच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार….निवडणूक प्रक्रिया अगदी सहज सुलभ पार पडावी यासाठी कायदा सुव्यवस्था, नियोजन, आयोजन उत्तमरित्या सांभाळणारे पोलीस, सरकारी कर्मचारी आणि महत्त्वाचं म्हणजे आपले कर्तव्य बजावणारे सुजाण नागरिक तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद….जनतेचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी दिवस-रात्र काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील माझे सर्व कार्यकर्ते यांच्यासाठी विशेष प्रेम. लोकशाही बळकट करण्याची ही लढाई अशीच सुरू राहील,” असेही जयंत पाटील यांनी पक्षाच्या सर्व सदस्यांना वैयक्तिक पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. “जे सोडून गेले ते गेले, 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या सर्वांना संपूर्ण राज्य ढवळून काढायचे आहे आणि शरद पवार यांच्या विचारांचे सरकार आणायचे आहे,” असेही आवाहन जयंत पाटील यांनी पत्रातून केले आहे.
विधानसभेच्या निवडणुकीतही जिद्दीने कार्यरत राहण्याचे पाटील यांचे आवाहन
राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन होऊन दोन गट पडल्यानंतर यंदा प्रथमच लोकसभेची निवडणूक पार पडली. दरम्यान, पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अक्षरशः जीवाचे रान केले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही शंभरावर सभा घेऊन संपूर्ण राज्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दबदबा निर्माण केला. एकूण पाच टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये अविश्रांत मेहनत घेणाऱ्या पक्षाच्या सदस्यांना यापुढील काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही जिद्दीने कार्यरत राहण्याचे आवाहन जयंत पाटील पत्रातून केले आहे.