पाळधीच्या सभेतील गद्दारीचा तो किस्सा…शिंदे सेनेला फुटला दरदरून घाम !

जळगाव टुडे । लोकसभेच्या निवडणुकीत मराठा आरक्षण तसेच संविधानाची ढाल करून महायुतीचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे काम महाविकास आघाडीने केले. त्याचा मोठा फटका बसल्याने भाजपला पराभवाचे तोंड सुद्धा पाहावे लागले. त्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीतही तोच कित्ता गिरवण्याच्या विचारात असलेल्या महाविकास आघाडीने विशेषतः शिंदे सेनेच्या आमदारांना गद्दार शब्दावरून पुन्हा खिंडीत पकडण्याचा प्लान केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, गद्दार शब्दाचा धसका घेतलेल्या शिंदे सेनेला जळगाव जिल्ह्यातील अशाच एका गावातील किश्श्यामुळे दरदरून घाम फुटल्याचे ऐकण्यात आले आहे. (Jalgaon Politics)

विधानसभेच्या निवडणुकीत शिंदे सेनेला कोंडीत पकडण्यासाठी विद्यमान आमदारांना गद्दार संबोधून आघाडीकडून त्यांच्या विरोधात जोरदार प्रचार केला जाणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याला कसे तोंड द्यायचे, असा प्रश्न साहजिक शिंदे सेनेला सतावत आहे. अलिकडे जाहीर कार्यक्रमात कोणी नुसता गद्दार शब्द उच्चारला तरी शिंदे सेनेला घाम फुटू लागतो. शिंदे सेनेचे मंत्री असलेल्या धरणगाव तालुक्यातील गावात नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमातही त्याचा प्रत्यय आला. एका माजी जि.प.सदस्याने भाषणात बोलताना आपल्याच पक्षाच्या गद्दारीविषयी भाष्य केले. त्यानंतर शिंदे सेनेच्या आमदारांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. यापुढे आपण स्वतः तरी गद्दार शब्द लोकांसमोर बोलू नका, असेही त्यांनी संबंधित वक्त्याला सुनावले. त्या प्रकाराची नंतर सगळीकडे चर्चा देखील रंगली.

दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीत मोठी बाजी मारण्याच्या उद्देशाने एकत्र आलेले भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नाकात दम आणण्यात महाविकास आघाडीने कोणतीच कसर ठेवली नव्हती. त्यामुळे 45 पारचा नारा देणाऱ्या महायुतीला निकालात मोठी नामुष्की पत्करावी लागली. लोकसभा निवडणुकीत शिंदे गट आणि अजित पवार गट यांना सोबत घेणे भाजपची मोठी चूक होती, या निष्कर्षापर्यंत संघ परिवार येऊन पोहोचला. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला सोबत न घेता स्वबळावर निवडणूक लढण्याचा विचार देखील त्यामुळे आता भाजप करू लागला आहे. अशा बिकट स्थितीत होते नव्हते तेवढे अवसान गळून पडल्याने शिंदे सेना व राष्ट्रवादीचा अजित पवार गट गलितगात्र होऊन बसल्याचे सांगितले जात आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button