जळगाव पोलिस दलाकडून जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
Jalgaon Police : जागतिक महिला दिनानिमित्त जळगाव पोलिस दलाकडून 03 ते 08 मार्च 2024 दरम्यान महिलांकरीता योग, कराटे प्रशिक्षण, वैद्यकीय शिबीर तसेच मॅरेथॉन स्पर्धा आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात जास्तीतजास्त महिलांना सहभागी होण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
03 ते 07 मार्चच्या कालावधीत सकाळी आठ ते नऊ वाजेदरम्यान महिलांकरीता विनामूल्य योग शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. याशिवाय 05 मार्चला सकाळी आठ ते दहा दरम्यान महिलांकरीता विनामूल्य कराटे व सेल्फ डिफेन्स शिबीर होईल. 06 मार्चला सकाळी नऊ ते दुपारी दोन दरम्यान महिलांकरीता वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात येईल. 07 मार्चला सकाळी सहाला 15 ते 25 वयोगट तसेच 25 वर्षांवरील वयोगटाच्या महिलांकरीता तीन किलोमीटर, पाच किलोमीटर चालण्याची व धावण्याची स्पर्धा घेतली जाईल. 08 मार्चला सकाळी नऊला सकाळी महिलांची नऊवारी साडी तसेच विविध वेशभूषेवर हेल्मेट रॅली काढण्यात येणार आहे. सर्व शिबीर तसेच कार्यक्रम व स्पर्धा विनामूल्य आहेत. सहभाग नोंदविण्यासाठी महिलांनी पोलिस अंमलदार अश्विनी निकम (मो. 9595091423) आणि महिला पोलिस जागृती काळे (मो. 8605038647) यांचेशी संपर्क साधावा, असे पोलिस अधीक्षक कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.