वावडदा येथील ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी ठरविले अपात्र !
Jalgaon News : जळगाव तालुक्यातील वावडदा येथील ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांना मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अपात्र ठरविले आहे. भारती संतोष पवार आणि राकेश नामदेव भिल, अशी अपात्र ठरलेल्या सदस्यांची नावे आहेत.
Jalgaon News: Two members of the Gram Panchayat of Vavadda have been disqualified by the District Collector!
भारती पवार व राकेश भिल यांची निवड वावडदा ग्रामपंचायतीवर १८ जानेवारी २०२१ रोजी झाली होती. मात्र, राखीव जागेवर निवडून आलेल्या दोन्ही सदस्यांनी एक वर्षाच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेच नव्हते. दरम्यान, शासनाने स्वतंत्र अध्यादेश काढून जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आणखी मुदत वाढवून दिली होती. त्यानंतरही वावडदा ग्रामपंचायतीचे सदस्य भारती पवार व राकेश भिल यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे सरपंच राजेश वाडेकर यांनी दोघांच्या विरोधात जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या सुनावणीत देखील दोघांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामपंचायत सदस्य भारती पवार व राकेश भिल यांना अपात्र ठरविले. अर्जदाराचा विवाद अर्ज मंजूर करून ग्रामपंचायतीची मुदत संपेपर्यंत दोन्ही सदस्यांना पदावरून हटविण्याचा निर्णय घेतला. प्रस्तुत प्रकरणाचा पाठपुरावा सरपंच राजेश नारायण वाडेकर यांनी सातत्याने चालू ठेवला होता.